गर्भावास्थेमध्ये महिलांनी करावे या फळांच्या व भाज्यांच्या रसांचे सेवन

JUICE
महिलांनी गर्भावास्थेमध्ये स्वतःच्या आणि गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी योग्य, संतुलित, आणि पौष्टिक आहार घेणे अतिशय आवश्यक असते. बाळाची योग्य वाढ आणि महिलेचे आरोग्य, ती घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. पण अनकेदा तेच ते पदार्थ खाऊनही कंटाळा येत असल्यामुळे आहारामध्ये निरनिरळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे अगत्याचे असते. पदार्थ निरनिराळे असण्यासोबतच ते पौष्टिक, पचण्यास सुलभ आणि शक्तिवर्धक असणे आवश्यक असते. अश्या वेळी इतर पदार्थांच्या सोबत फळांच्या रसांचा समावेश आहारामध्ये केला जाणे गरजेचे ठरते.
ताज्या फळांचे आणि भाज्यांचे सेवन गर्भावास्थेमध्ये महिलांसाठी लाभकारी असते. पण अनेकदा काही फळे आणि भाज्या गर्भावास्थेमध्ये असताना खाव्याश्या वाटत नाहीत. या अवस्थेमध्ये उद्भविणारा ‘नॉशिया’, म्हणजेच एखादा अन्नपदार्थ पाहून किंवा त्याच्या वासाने तो पदार्थ अजिबात न खावासा वाटणे, किंवा एखादी भाजी खाल्ल्याने ‘ब्लोटिंग’ होणे, अश्या काही समस्यांच्या मुळे काही फळे आणि भाज्या खाण्याचे टाळले जाते. त्यामुळे पोटातील बाळाला आणि महिलेला स्वतःला देखील भाज्यांमधील आणि फळांच्या मधील पोषक तत्वे पुरेपूर मिळून शरीरामध्ये पाण्याचे प्रमाणही आवश्यकते नुसार राहावे याकरिता रसांचे सेवन करणे योग्य ठरेल.
JUICE1
दर दिवशी एखाद्या नवीन भाजीचा किंवा फळांचा रस घेतल्याने यामध्ये ही विविधता आणता येईल. ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या भाज्या आणि फळांचे रस आहारामध्ये समाविष्ट असणे चांगले. हे रस ताज्या भाज्या किंवा फळांचा वापर करून बनविणे उत्तम. पॅकेज्ड किंवा डबाबंद रसांमध्ये साखर आणि इतर प्रिझर्व्हेटीव्हज असल्याने या प्रकारच्या रसांचे सेवन टाळणे आवश्यक आहे. गर्भावास्थेमध्ये महिलांनी काही रसांचे सेवन अवश्य करायला हवे. संत्र्यामध्ये असलेली जीवनसत्वे ( क जीवनसत्व आणि पोटॅशियम ) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आहे. सर्दी-पडसे, फ्लू यांसारख्या साधारण इन्फेक्शन्स पासून ही जीवनसत्वे शरीराचा बचाव करीत असतात. या रसाच्या नियमित सेवनामुळे लहान मोठे विकार शरीरापासून दूर राहतात आणि वारंवार औषधे घेण्याची आवश्यकता भासत नाही.
JUICE2
गाजरामध्ये अ, व इ जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. याचा रस महिलेच्या आरोग्याकरिता उत्तम आहेच, शिवाय बाळच्या दृष्टीचा विकास होण्यासाठी सहायक आहे. गाजराचा रस लिव्हर मध्ये साठलेली विषारी द्रव्ये शरीराच्या बाहेर टाकण्यास सहायक आहे. या रसाच्या सेवनामुळे त्वचा, डोळे, केस निरोगी राहण्यास मदत होते. गर्भावास्थेमध्ये अनेक महिलांच्या बाबतीत केसगळतीची समस्या उद्भाविते. गाजराच्या रसाच्या सेवनाने केसगळतीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. तसेच हार्मोन्स संतुलित ठेवण्यासही या रसाचे सेवन करणे चांगले. गाजरासोबत बीटाच्या रसाचे सेवन देखील अतिशय आरोग्यदायी ठरते. यामुळे शरीरातील ताकद टिकून राहून अनिमियासारखे विकार उद्भिवण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. या रसामध्ये लोह मुबलक मात्रेमध्ये असते. तसेच पचनक्रिया सुरळीत राहावी या करिता देखील या रसाचे सेवन केले जाणे आवश्यक आहे.
JUICE3
सफरचंद, पीच आणि स्ट्रॉबेरी या फळांचे रस देखील गर्भावास्थेमध्ये महिलेसाठी उत्तम आहेत. पण ही फळे वर्षभर उपलब्ध नसल्यामुळे जेव्हा ही फळे उपलब्ध असतील तेव्हा ही फळे ताजी असताना खावीत, किंवा यांच्या रसांचे सेवन करावे. स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, तसेच यामध्ये फोलेट हे जीवनसत्व असते, जे गर्भावस्थेतील महिलेकरिता अतिशय आवश्यक असते. या फळांच्या रसांप्रमाणे लिंबाचे सरबत आणि नारळाचे पाणी देखील गर्भारशी महिलेकारिता उत्तम आहे. लिंबाच्या रसातून मिळणारे क जीवनसत्व आणि नारळाच्या पाण्यातून मिळणारे इलेक्ट्रोलाईट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवितात आणि या अवस्थेमध्ये जाणविणारा थकवा आणि अशक्तपणा दूर ठेवण्यास मदत करतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment