चौसष्ट वर्षीय पुत्राचे आपल्या आईला शोधून काढण्याचे प्रयत्न अखेर यशस्वी

SON
तो काळ असा होता, जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये देखील कुमारी मातेला, म्हणजेच विवाह न होता अपत्य जन्माला घालणाऱ्या स्त्रीला समाजाच्या टीकेचा, निंदेचा, अपमानाचा सामना करावा लागत असे. आजच्या प्रगत आणि पुढारलेल्या विचारांचे बीजही त्या काळी समाजामध्ये रुजलेले नव्हते. त्या काळी एका कुमारी मातेने लोकलाजेस्तव आपले अपत्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका टेलिफोन बूथमध्ये सोडून दिले. याच मुलाने वयाच्या चौसष्टाव्या वर्षी आपल्या आईला शोधून काढण्यात यश मिळविले. हे नेमके कसे शक्य झाले याची कहाणी मोठी रोचक आहे. खरे तर या मुलाजवळ आपल्या आईची कोणतीही आठवण नसताना देखील त्याने तिच्या पर्यंत पोहोचण्यात यश मिळविले, हे आश्चर्यच म्हणावे लागेल, नाही का?
SON1
१९५४ सालच्या थंडीतील एके सकाळी ओहायो शहरातील लँकॅस्टरमधील एका फोन बूथ कडे लोकांचे अचानक लक्ष वेधले गेले. त्याला कारणही तसेच होते. त्या बूथ मधून एका तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज कानी पडत होता. कुतूहल वाटून लोकांनी जवळ जाऊन पाहिले, तर त्या बूथमध्ये एक तान्हे मूल एकटेच असलेले त्यांच्या दृष्टीला पडले. त्या मुलाच्या जवळ दुधाची बाटली देखील ठेवली होती, मात्र मुलाच्या आईचा किंवा वडिलांचा कुठेच पत्ता नव्हता. अवघ्या दीड-दोन महिन्यांचे ते मूल न जाणे किती वेळापासून तसेच रडत होते. अखेरीस स्टॅन्ली आणि विवियन डेनिस या दाम्पत्याला त्या मुलाची अवस्था पाहून गहिवरून आले, आणि त्यांनी या नवजात अर्भकाला आपल्या घरी आणले. ही बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आणि लोक या मुलाला ‘बूथ बेबी’ म्हणून ओळखू लागले.
SON2
या बाळावर हक्क सांगणारे कोणीहे पुढे न आल्यामुळे डेनिस दाम्पत्याने या बाळाला कायदेशीर रित्या दत्तक घेऊन त्याचे नाव स्टीव ठेवले. स्टीव मोठा झाला, शिकून सवरून नोकरीलाही लागला. कालांतराने त्यांचा विवाह झाला आणि त्याला अपत्येही झाली. जेव्हा स्टीवच्या मुलांना आपल्या पित्याबाद्द्लचची कहाणी समजली, तेव्हा त्यांनी स्टीवला त्यांच्या आईला शोधून काढण्यास प्रोत्साहन दिले. मुलांच्या आग्रहास्तव स्टीव यांनी ‘अॅन्सेस्टर डॉट कॉम’ द्वारे आपली डीएनए चाचणी करविली. त्यानंतर तीन महिन्यांनी त्यांना एक इ-मेल आली. ही इमेल लिहिणाऱ्या व्यक्तीने आपणा स्टीवचे नातलग असल्याचे म्हटले होते. आपण आपल्या घरातील मंडळींकडून फोन बूथ मध्ये सोडून दिलेल्या तान्ह्या मुलाची कहाणी अनेकदा ऐकली असल्याचे या नातलगाने त्याच्या इ-मेलमध्ये म्हटले होते. ते मूल आपल्या परिवारातील असून, त्याच्याबद्दल कोणी फारशी चर्चा आता करीत नसल्याचा उल्लेखही या इ-मेलमध्ये होता.
SON3
या इ-मेलचा पाठपुरावा केल्यानंतर स्टीवला आपल्या सावत्र बहिणीच्या विषयी माहिती मिळाली. तिने स्टीवला त्यांची आई अद्याप जिवंत असून, बाल्टीमोर येथे राहत असल्याचे सांगितले. अश्या रीतीने स्टीवने तब्बल चौसष्ट वर्षांच्या नंतर आपल्या जन्मदात्या आईला शोधून काढण्यात यश मिळविले.