कोरोवाई- खास युक्रेनियन परंपरा.

korovai

याला कोरोवाई, कारावाई, क्रवाई अश्या अनेकविध नावांनी ओळखले जाते. एखाद्या जोडप्याच्या विवाहाच्या निमित्ताने बनविला जाणारा हा खास ब्रेड आहे. अश्या प्रकारचा कोरोवाई ब्रेड बनविण्याची परंपरा युक्रेनमधील गावांमध्ये गेली अनेक शतके सुरु आहे. हा ब्रेड या जोडप्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या शुभेच्छा व्यक्त करणारा आहे. याचे कारण म्हणजे, हा ब्रेड बनविण्यासाठी गावातील प्रत्येक घराचा या मध्ये हातभार लागलेला असतो. गावातील सर्व परिवार मिळून हा ब्रेड, नवदाम्पत्यासाठी बनवीत असतात.

korovai1
विवाहसोहोळ्यापूर्वीच्या शनिवारी हा खास ब्रेड बनविण्यासाठी गावातील सात महिला एकत्र येतात. पारंपारिक गीते गात या ब्रेडसाठी पीठ मळण्याचे काम सुरु होते. या पारंपारिक गीतांमध्ये विवाहसोहोळ्याच्या गीतांचा ही समावेश असतो. हा ब्रेड, नवदाम्पत्यासाठी त्यांचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि समाधानाचे असावे अश्या शुभेच्छा देण्यासाठी बनविला जात असल्याने, ज्या महिलांचे वैवाहिक जीवन सुखाचे आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पारिवारिक क्लेश नाहीत, केवळ अश्याच महिलांना हा ब्रेड बनविण्यास आमंत्रित केले जाते. ज्या महिलांचे पहिले विवाहसंबंध संपून ज्यांनी दुसरा विवाह केला आहे, अश्या महिलांना हा ब्रेड बनविण्यासाठी आमंत्रित करणे टाळले जाते. ब्रेडचे पीठ मळून झाल्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये सुखी असलेल्या पुरुषानेच हा ब्रेड भाजण्यासाठी ओव्हन मध्ये ठेवायचा असतो. एकंदर विवाहसोहोळ्यामध्ये आणि नवदाम्पत्याच्या भावी जीवनामध्ये कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने हे नियम पाळले जातात.

ओव्हनमध्ये भाजला जाणाऱ्या ब्रेड ला जर खूप भेगा पडल्या, तर हे अशुभाचे लक्षण समजले जाते. त्या उलट जर कोरोवाई ओव्हनमध्ये छान फुलला, तर नवदाम्पत्याचे वैवाहिक जीवन समाधानचे असेल, असे मानले जाते. नवदाम्पत्यासाठी ‘वेडिंग ब्रेड्स’ बनविण्याची ही अनोखी परंपरा रशिया, बल्गेरिया, पोलंड, रोमेनिया या देशांमध्ये ही अस्तित्वात असली, तरी युक्रेनियन कोरोवाई मात्र त्यावर केल्या जाणाऱ्या सजावटीसाठी ओळखला जातो. या ब्रेडवर, खास तयार करून लावण्यात येणारी छोटी गुलाबाची फुले सौंदर्याचे प्रतीक मानली जातात. तर गव्हाची कणसे भरभराट, सुबत्ता दर्शवितात. या ब्रेडच्या वर दोन पक्ष्यांची जोडी ही तयार करून लावण्यात येते. ही जोडी नवदाम्पत्याची प्रतीक असते. विवाहसोहोळ्यादरम्यान हा ब्रेड, जिथे विधी सुरु असतात, तिथे ठेवला जातो. विवाह संपन्न झाल्यानंतर या ब्रेड सर्व पाहुणे मंडळींमध्ये वाटला जातो.

Leave a Comment