असे आहे ब्रिटनच्या राणी एलिझाबेथचे बकिंगहॅम पॅलेस

queen
ब्रिटनच्या राजघराण्याचे अस्तित्व अलीकडच्या काळातील नसून, अनेक शतकांपूर्वीपासूनचे आहे, हे आपण जाणतोच. या राजघराण्याच्या इतिहासामध्ये बकिंगहॅम पॅलेस या औपचारिक शाही निवास्थानाची भर मात्र तितकी प्राचीन नाही. राजघराण्याचा अनेक शतकांचा इतिहास पाहता, हे निवासस्थान नवेच म्हणावे लागेल. हे शाही निवासस्थान एक अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेच, पण त्याचबरोबर अनेक शाही औपचारिक समारंभ, राजकीय भेटीगाठी आणि सल्लामसलती या ठिकाणीच नेहमी पार पडत असतात. शिवाय ब्रिटनची राणी एलिझाबेथचे वास्तव्यही याच पॅलेसमध्ये असते.
queen2
बकिंगहॅम पॅलेस हे एका अर्थी ब्रिटीश संस्कृतीचे प्रतीक असले, तरी याच्या इतिहासाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. या राजेशाही भव्य वास्तूशी निगडित अशी अनेक तथ्ये आहेत, जी लोकांच्या परिचयाची नाहीत. ब्रिटीश इतिहासातील अनेक महत्वाच्या घडामोडी या वास्तूने पाहिल्या आहेत. अनेक शाही विवाहसोहोळ्यांपासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी झालेल्या बॉम्बहल्ल्यांपर्यंत घडलेल्या अनेक घटनांची साक्ष देत ही भव्य वास्तू आजही दिमाखात उभी आहे. आजच्या काळामध्ये या वास्तूचा विस्तार तब्बल ८३०,००० स्क्वेअर फुट इतका विशाल असून, या महालामध्ये ७७५ कक्ष आहेत. या ७७५ कक्षांमध्ये ५२ शाही कक्ष आणि गेस्ट रूम्स, येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता १८८ कक्ष, ९२ कार्यालये आणि ७८ बाथरूम्स असा हा मोठा पसारा आहे. या महालाच्या बेसमेंटमध्ये केवळ शाही परिवाराच्या सदस्यांना वापरता यावे यासाठी स्वतंत्र एटीएम मशीन ही आहे. या वास्तूच्या सभोवतालच्या ३९ एकर जागेमध्ये सुंदर बागा आहेत.
queen3
बकिंगहॅम पॅलेसची मूळ वास्तू १७०३ साली बांधण्यात आली. त्या काळी ही वस्तू आजच्याइतकी भव्य नसून, तेव्हा ही वास्तू बकिंगहॅम हाउस म्हणून ओळखली जात असे. त्याकाळचे मालग्रेवचे तिसरे ‘अर्ल’ जॉन शेफिल्ड यांच्याकरिता या वास्तूचे निर्माण करण्यात आले होते. त्याकाळी ब्रिटीश शाही परिवाराचे वास्तव्य सेंट जेम्स पॅलेस येथे असे. ज्या भूभागावर बकिंगहॅम पॅलेसची वास्तू उभी आहे, तो भूभाग वेस्टमिन्स्टर या नावाने ओळखला जात असून, गेली चारशे वर्षे हा भाग शाही मालमत्तेचा भाग आहे. तत्पूर्वी हा भूभाग जॉन शेफिल्ड यांनी विकत घेऊन त्यावर बकिंगहॅम हाउस बनविले होते.
queen4
१७६१ साली ब्रिटनचे राजे तिसरे जॉर्ज यांनी आपल्या पत्नी राणी शार्लोट हिला भेट देण्यासाठी बकिंगहॅम हाउस खरेदी केले. राजे चौथे जॉर्ज यांच्या काळी या वास्तूचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले. राजे जॉर्ज यांनी जॉन नॅश नामक स्थापत्यविशारदाला ही जबाबदारी सोपविली. नॅशने या वास्तूचा संपूर्णपणे कायापालट करीत, तसेच अनेक नव्या इमारतींचे निर्माण करीत, इंग्रजी ‘u’ अक्षराच्या आकाराप्रमाणे नवी वास्तू उभारली. चौथे जॉर्ज यांच्यानंतर त्यांचे बंधू चौथे विलियम ब्रिटनचे राजे बनले आणि त्यांच्यानंतर आली राणी व्हिक्टोरिया. १८३७ साली राणी व्हिक्टोरिया ब्रिटनची राणी बनल्यानंतर बकिंगहॅम पॅलेस हे राणीचे औपचारिक निवासस्थान बनले. तेव्हापासून आजतागायत ही वास्तू शाही परिवाराचे आणि ब्रिटीश परंपरेचे प्रतीक बनून राहिली आहे.
queen1
आता ही वास्तू पर्यटकांसाठी देखील खुली करण्यात आली आहे. या वास्तूतील एकोणीस कक्ष पर्यटकांना पाहता येतात. दर उन्हाळ्यामध्ये दहा आठवड्यांसाठी येथे पर्यटकांना येण्यास मुभा असते. या वास्तूमध्ये असलेले उत्तमोत्तम फर्निचर, भव्य पेंटींग्ज, अनेक कलात्मक, प्राचीन वस्तू, या वास्तूची शान दर्शविणाऱ्या आहेत.

Leave a Comment