सुट्टीवर जाताना अशी घ्या आपल्या घरातील झाडांची काळजी

plant
आपल्यापैकी अनेकांना घरामध्ये शोभे झाडे, निरनिराळी फुलझाडे लावण्याची आवड असते, हौस असते. घराच्या भोवती, गच्चीवर किंवा घराच्या बाल्कनी मध्ये निरनिराळी फुलझाडे लाऊन केलेली छानशी बाग कोणाला आवडणार नाही? पण या झाडांची योग्य निगा राखणे, त्यांचे खत-पाणी वेळच्यावेळी पाहणे, त्यावर कीटकनाशाकांची फवारणी, ऋतुमानानुसार त्यांची निगा या सर्व जबाबदाऱ्याही तितक्याच महत्वाच्या असतात. ही कामे पार पाडण्यासाठी माळी उपलब्ध असेलच असे नाही. त्यातून जर परगावी जायची वेळ आली, तर फुलझाडांना नियमित पाणी कोण घालणार हा ही मोठाच प्रश्न असतो. अश्या वेळी काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे ठरते.
plant1
घराच्या आतमध्ये असणाऱ्या फुलझाडांची निगा व्यवस्थित राखली असेल, त्यांना पाणी वेळच्या वेळी आणि पुरेसे दिले असेल, तर ही फुलझाडे पाण्यावाचूनही तीन ते चार दिवस व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे चार पाच दिवसांकरिता बाहेर जाण्याची वेळ आली, तर झाडांना व्यवस्थित पाणी घालावे, आणि घराच्या ज्या भागामध्ये दिवसातील थोडा वेळ सूर्यप्रकाश येत असेल, तिथे ही फुलझाडे ठेवावीत. घराच्या बाहेर, गच्चीवर किंवा बाल्कनीमधील झाडे लवकर सुकतात. त्यामुळे सुट्टीसाठी बाहेर पडण्यापूर्वी या झाडांना भरपूर पाणी द्यावे, आणि शक्य असल्यास ही झाडे ही घराच्या आत ठेवावीत, म्हणजे ती लवकर सुकणार नाहीत.
plant2
जर जास्त दिवसांकरिता सुट्टीवर जाणार असाल, तर आपल्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीवर झाडांना पाणी देण्याची जबाबदारी सोपवावी. झाडांना पाणी घालण्याच्या कामी फारसे कौशल्य लागत नसल्याने ही जबाबदारी स्वीकारणे फारसे कठीण नाही. सुट्टीसाठी बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येक झाडाला किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्या व्यक्तीला आवश्यक त्या सूचना द्याव्यात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना वेळोवेळी पाण्याची आवश्यकता असते. पण एरव्ही झाडांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणी दिले तरी झाडे व्यवस्थित राहतात.
plant3
झाडांच्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार त्यांचे वेगवगळे गट करून ठेवावेत. त्यामुळे पाणी देणाऱ्या व्यक्तीला कोणत्या झाडाला किती पाणी लागते हे लक्षात येणे सोपे होईल. जर झाडे बाहेर बागेमध्ये लावली असतील तर ठिबक सिंचन सिस्टम लावून घेण्याबाबतही विचार करता येईल. झाडे कुंड्यांमध्ये असतील, तर प्रत्येक कुंडीमध्ये एक मोठी प्लास्टिकची बाटली पाण्याने भरून ठेवावी. या बाटलीला छोटी छोटी भोके करावीत. या भोकांमधून पाणी कुंड्यांमध्ये झिरपत राहील आणि झाडांना आवश्यक तेवढे पाणी ही सहज मिळेल.