विहिंपने धर्मांतर केलेल्या महिलेल्या हिंदूपणावर शंका नको – न्यायालय

court
विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केलेल्या ख्रिस्ती महिलेच्या धर्मांतरानंतर ती हिंदू असल्याबाबत शंका घेता नाही येणार, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. विहिंप ही हिंदू धर्मातील प्रतिष्ठित संघटनांपैकी एक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

या महिलेने अनुसूचित जातीच्या कोट्यामधून शिक्षिकेची नोकरी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्या. आर. सुरेश यांच्यासमक्ष झाली. ए. मेगलै असे या महिलेचे नाव असून ती तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील आहे. तिने 20 वर्षांपूर्वी हिंदू धर्म स्वीकारला होता. ती सातत्याने हिंदू धर्माचे पालन करते किंवा हिंदू समाज अथवा संघटनेने तिचे धर्मांतर स्वीकारले आहे, याचा कोणताही निश्चित पुरावा तिने दिलेला नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारने केला होता.

ही महिला ख्रिश्चन धर्मातील अनुसूचित जातीची असून तिने स्वखुशीने हिंदू धर्म स्वीकारला होता. त्यासाठी विहिंपने 1 नोव्हेंबर 1998 रोजी पूजा केली होती. ही संघटना हिंदू धर्माची महानता व समृद्धता यांचा प्रसार करते आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. या महिलेच्या शेजाऱ्यांनीही ती हिंदू प्रथांचे पालन करत असल्याचे मत व्यक्त केले होते.