या अभिनेत्रींनी परिवाराच्या देखभालीसाठी केला अभिनयक्षेत्राचा त्याग

TV
आजवर लहान आणि मोठ्या पडद्यांवरील अनेक अभिनेत्री विवाहापश्चात, आपल्या परिवाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून, टीव्ही जगतात, किंवा चित्रपटसृष्टीमध्ये आपले पाय घट्ट रोवून उभ्या आहेत. काही अभिनेत्रींनी मात्र विवाहानंतर शो बिझच्या ग्लॅमरस जगाला कायमचा रामराम ठोकला आणि आपले करियर या झगमगत्या दुनियेमध्ये करण्याऐवजी परिवाराच्या देखभालीला अधिक प्राधान्य दिले.
TV1
एकता कपूर निर्मित सुपरहिट टीव्ही मालिका कहानी घर घर की या मालिकेमध्ये भूमिका साकारलेली श्वेता केसवानी या अभिनेत्रीने शो बीझ मधून एक्झिट केले, ते कायमचेच. तिचा जोडीदार केन अँडीनो याच्याशी तिची भेट न्यू यॉर्क शहरामध्ये झाल्यानंतर त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१३ साली त्यांना पहिले अपत्यही झाले. तेव्हापासून श्वेताने आपल्या परिवाराला आणि मुलाच्या संगोपनाला प्राधान्य देत टीव्ही मालिका आणि शो बिझ पासून लांबच राहणे पसंत केले आहे.
TV2
‘कुमकुम एक प्यारासा बंधन,’ ‘शरारत,’ ‘बात हमारी पक्की’ इत्यादी मालिकांमध्ये भूमिका केलेली अभिनेत्री अदिती शिरवळकर हिने ही २०१३ सालापसून अभिनेयक्षेत्राचा निरोप घेतला आहे. ‘२६/११’ ही तिने भूमिका केलेली अखेरची मालिका होती. आता आदिती आपल्या पारिवारिक जीवनात रमली आहे. ती तिच्या पतीचा रेस्टॉरंटचा व्यवसाय सांभाळण्यात मदत करीत असते. अदितीचा पती मोहित हा ही अभिनयक्षेत्रातील असून, त्याने ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मध्ये भूमिका केली होती.
TV3
अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका ‘बालिकावधू’ मध्ये ‘गौरी’ ची भूमिका केलेली अंजुम फारुकी हिनेही तिच्या विवाहापश्चात शो बिझच्या दुनियेचा निरोप घेतला. अंजुमने तिच्या पालकांनी तिच्यासाठी निवडलेल्या जोडीदाराशी विवाह करून, ती आता परिवाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटून गेली आहे. अंजुमचा पती साकिब सैय्यद मर्चंट नेव्हीमध्ये असून, सध्या अंजुम गृहिणीच्या भूमिकेमध्ये रुळली आहे.
TV4
सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय ठरलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेनच्या भूमिकेला अजरामर केले अभिनेत्री दिशा वाकानी हिने. दिशाने विवाहापश्चातही या मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका साकारली होती. मात्र आता दिशाला कन्यारत्न लाभल्याने मुलीच्या संगोपनासाठी दिशाने मालिकेमधून काही काळाकरिता तरी विश्रांती घेतली आहे. या मालिकेमध्ये इतक्यात परतण्याचा तिचा विचार नसल्याचे दिशा म्हणते. तसेच सध्या आपले सर्व लक्ष आपल्या मुलीच्या संगोपनावर असून, योग्य वेळी अभिनेयक्षेत्रामध्ये पुनरागमन करण्याचा आपला विचार असल्याचे दिशा म्हणते. आधी मुलीच्या जन्मानंतरही लोकाग्रहास्तव मालिकेच्या काही भागांमध्ये दिशा दिसली होती, मात्र मुलीच्या संगोपनासाठी तिला वेळ देण्याची गरज असल्याने तिने तात्पुरता तरी अभिनयक्षेत्राचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.