पाकिस्तानातील ही मुस्लीम शिक्षिका मंदिरात देते धर्मनिरपेक्षतेचे धडे

teacher1
कराची – पाकिस्तानच्या कराचीतील बस्ती गुरू या भागातील हिंदू वसाहतीत आनम आघा या मुलांसाठी शाळा भरवतात. कट्टरपंथीय मुस्लीम घटकांकडून या शाळेला येणाऱ्या धमक्या आता नित्याच्या झाल्या आहेत. पण आनम या धमक्यांना न घाबरता आपले ज्ञानदानाचे काम तितक्याच नेटाने करत आलेल्या आहेत. आनम आघा जेव्हा कराचीतील हिंदू मंदिरात पारंपरिक मुस्लीम हिजाब परिधान करून मुलांना शिकवण्यास येतात, तेव्हा त्यांच्या सलामला तितक्याच निरागसपणे मुलांकडून जय श्रीराम असे अभिवादन केले जाते व वर्ग सुरू होतो.

जवळपास ८० ते ९० हिंदू कुटुंब अल्पसंख्याकांच्या या वस्तीत राहत असून येथील भकासपणाची साक्ष मोडकळीस आलेल्या झोपड्या व अर्धी कच्ची बांधली गेलेली घरे देतात. आनम आघा वर्ग संपल्यानंतरच्या अनौपचारिक गप्पांमधून मुलांना औपचारिक शिक्षण देण्याबरोबरच मानवी मूल्यांची शिकवण देण्याचेही काम करत असतात. मागच्या वर्षीपासून वस्तीत शाळा सुरू केली तेव्हा मोडकळीस आलेल्या मंदिरात वर्ग भरवले जात आहेत, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व नाराजी व्यक्त केली होती. पण दुसरी जागाच वस्तीतील मुलांना शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध नसल्याचे त्यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान म्हटले आहे.
teacher
अनेक हिंदू देवी देवतांच्या प्रतिमा मोडकळीस आलेल्या मंदिरांच्या भिंतींवर आहेत. अल्पसंख्याक मुलांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पुरवण्याचा विडा त्यांनी उचलला. त्यांनी त्यामुळे कट्टरपंथीयांची नाराजीही ओढवून घेतली आहे. ६०च्या दशकात सिंध प्रांतातील घोटकीतून कराचीत विस्थापित झालेले अल्पसंख्याक हिंदू गेल्या ५० वर्षांपासून येथे राहत आहेत. हिंदूनी मुस्लीमबहुल प्रदेशात वस्ती स्थापन करून जमीन हडपली असल्याचा दावा येथील कट्टरतावाद्यांनी केला असून अनेक वर्षांपासून हिंदूना येथून हिसकावून लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर येथे मस्जीद उभारण्याचा घाट स्थानिक मुस्लीम लोकांनी घातला असून त्यासाठी अल्पसंख्याकांना धमकावण्याचे सत्र गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच आहे.

वस्तीत मागील काही वर्षात जाळपोळ करून हिंदूना हुसकावून लावण्याचे प्रकार सात्यताने होत असून, वस्तीतील वीज व पाण्याचा पुरवठाही थांबवण्याता आला आहे. धर्मांध विचारसरणीवर मात करून मुलांमध्ये मानवी मूल्यांची जोपासना करण्यावर माझा भर आहे. शाळा वस्तीतच सुरू झाल्यामुळे अल्पसंख्याकांमध्ये नवा आशावाद जन्माला आला आहे. आता त्यांच्या मुलांना शाळेसाठी लांब जाण्याची गरज नसल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केल्याचे आघा म्हणाल्या.
teacher2
आपण स्वत: मुस्लीम असून आपल्याला हिंदू अल्पसंख्याक मुलांना शिकवण्यात येणाऱ्या अडचणीवर बोलताना त्या म्हणाल्या, की मुलांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची शाळेत काळजी घेतली जाते. कोणतीही धार्मिक मूलतत्ववादी शिकवण वर्गामध्ये दिली जात नाही. एकमेकांच्या धर्माप्रती आदर बाळगून सर्वधर्मसमभावाची शिकवण मुलांमध्ये जोपासण्यात यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शाळेत दोन्ही धर्माचे सण तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. विद्यार्थी माझ्या सलामला जय श्रीराम म्हणून आनंदाने अभिवादन करतात. वेगवेगळ्या धर्मांतील लोक सहचाराने एकमेकांमध्ये मिसळून कसे राहतात, याचे हे उदाहरण असून मुस्लीमबहुल देशात धार्मिक निरपेक्षतेचा आदर्श आम्ही प्रस्थापित केला आहे. हे सांगताना आनम आघा यांच्या चेहऱ्यावर अभिमान व आनंद ओसांडून वाहत होता.

Leave a Comment