इंडिया पोस्ट पेमेंट बँक – आता पोस्टमन तुमच्या दारी

IPPB
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये बहुप्रतिक्षित इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) या योजनेची सुरुवात करणार असून या बँकेची देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी शाखा ग्रामीण भागात आर्थिक व डिजिटल बँकिंग सेवा पुरवण्यासाठी उघडली जाईल. थेट ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचणारे सर्वात मोठे बँकिग नेटवर्क या योजनेद्वारे तयार होणार आहे.

२१ ऑगस्ट रोजी या बँकेचे उद्घाटन होणार होते. पण या योजनेचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन आणि त्यानंतरच्या सात दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की ग्रामीण भागात आयपीपीबीद्वारे बँकिंग सेवा पुरवली जाईल. ज्यामुळे १.५५ लक्ष पोस्टाच्या शाखांना आयपीपीबीशी जोडण्यास मदत होईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत सरकारतर्फे पोस्ट आणि आयपीपीबी यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. परिणामी हे थेट ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचणारे सर्वात मोठे बँकिग नेटवर्क तयार होईल.

याबाबत माहिती देताना आयपीपीबीचे सीईओ सुरेश सेठी यांनी सांगितले की, एकाचवेळी ६५० शाखांसह इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरू होणार आहे. या शिवाय देशभरातील ३२५० टपाल कार्यालयाच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध होतील. जवळपास ११००० पोस्टमन थेट घरापर्यंत बँकिंग सेवा पुरवतील. आयपीपीबीचे काम सुरू झाल्यावर ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंग आणि आर्थिक सेवांचा लाभ घेता येईल. आयपीपीबीला त्यासाठी १७ कोटी पोस्टल बचत खात्यांना जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही खात्यातील रक्कम नागरिक हस्तांतरित करू शकतील. मोबाईल अॅपद्वारे किंवा टपाल कार्यालयात जाऊन हे काम करता येईल.

Leave a Comment