नवी दिल्ली – तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील अॅपलच्या कार्यालयात देशातील प्रतिभावंत तरुणांना नोकरी मिळण्याची संधी असून यासाठी तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी अॅपलने भारतात तरुणांसाठी बंपर भरती काढली आहे. येथील आपल्या कार्यालयात नुकतीच ३ हजार ५०० जणांची कंपनीने नियुक्ती केली असून कंपनीचा ही संख्या ५ हजारापर्यंत नेण्याचा विचार आहे.
याबाबतची माहिती तेलंगणा सरकारमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली असून तेलंगणामधील कार्यालयात ३ हजार ५०० जणांची अॅपलने नियुक्ती केली आहे, ही संख्या लवकरच ५ हजार करण्याचा कंपनीचा विचार असल्यामुळे अजून दीडहजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. पण, ही भरती नेमकी केव्हापर्यंत होणार याबाबत कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
अॅपल कंपनीने गेल्या वर्षी मे महिन्यात तेलंगणामध्ये विकास केंद्राची स्थापना केली होती. या विकास केंद्रामुळे ४ हजार जणांना त्यावेळी रोजगार मिळू शकतो, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. कंपनीकडून या केंद्रामध्ये आयफोन, आयपॅड, मॅक आणि अॅपल वॉच या उत्पादनांवर काम केले जाते.