हॉलीवूडपट ‘किल बिल’चा बनणार हिंदी रिमेक

kilbil
धमाकेदार अॅक्शन आणि उत्कृष्ट तलवारबाजीच्या दृश्यांनी जगभरातील प्रेक्षकवर्गाला वेड लावणारी हॉलीवूड अभिनेत्री उमा थर्मन अभिनीत सुपरहिट सीरीज ‘ किल बिल ‘ आता लवकरच हिंदी भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे डबिंग हिंदीमध्ये होणार नाही, तर या सीरीजचा हिंदी रीमेक बनविला जाणार आहे. सुप्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक क्वेन्टिन टॅरँटीनो यांनी दिग्दर्शित केलेली ‘किल बिल’ सीरिज २००३ साली प्रदर्शित झाली होती. ही सीरिज हॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट मालिकांपैकी एक समजली जाते. बॉलीवूड अभिनेते आणि दिग्दर्शक निखील द्विवेदी यांनी या मालिकेचा हिंदी रीमेक बनविण्याचे निश्चित केले आहे.

या चित्रपट मालिकेचा हिंदी रीमेक बनणार असल्याचे वृत्त कानी पडताच, उमा थर्मनने ‘किल बिल ‘ मध्ये साकारलेली भूमिका हिंदी रीमेकमध्ये कोणती अभिनेत्री साकारणार, या बद्दल अनेक कयास लावले जाऊ लागले आहेत. या चित्रपटामध्ये उमा थर्मनने धमाकेदार अॅक्शन सीन्स दिले आहेत. त्यामुळे उमा थर्मनने दिले तितकेच दमदार अॅक्शन सीन्स आणि उत्तम अभिनय या रीमेक मध्ये देऊ शकेल अश्या अभिनेत्रीचा सध्या निखील द्विवेदी शोध घेत असल्याचे समजते.

या भूमिकेसाठी अनेक बॉलीवूड अभिनेत्रींशी संपर्क साधला जात असल्याचे समजते. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कटरिना कैफ, जॅकलीन फर्नांडीस, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, यांची नावे या भूमिकेसाठी विचाराधीन असल्याचे समजते. मात्र नायिकेच्या निवडीबद्दल अजून कोणतेही खात्रीशीर वृत्त प्रसिद्ध झालेले नाही. या हिंदी रीमेकचे चित्रीकरण नक्की केव्हा सुरु होणार आहे, याबद्दलची अधिकृत घोषणाही आतापर्यंत केली गेलेली नाही.