हैदराबाद येथील ‘आयकिया’ मध्ये पहिल्याच आठवड्यात ग्राहकांची तुफान गर्दी

IKEA
‘आयकिया’ या स्वीडिश चेनने भारतातील पहिलेच स्टोअर हैदराबाद येथे सुरु केले आहे. या स्टोअरला भेट देऊन येथून खरेदी करण्यासाठी पहिल्याच आठवड्यामध्ये ग्राहकांनी इतकी मोठी गर्दी केली, की अखेरीस आता ही गर्दी रोखायची कशी अशी समस्या ‘आयकिया’पुढे उभी राहिली आहे. आयकिया या जगातील सर्वात मोठ्या फर्निचर ब्रँडचे स्टोअर हैदराबादमध्ये नुकतेच सुरु झाले असून, दर दिवशी सर्वसाधारणपणे तीस हजार ग्राहक या ठिकाणी हजेरी लावीत असल्याचे समजते. या स्टोअरचे उद्घाटन ९ ऑगस्ट रोजी झाले होते.

पंधरा ऑगस्टच्या सुट्टीचे निमित्त साधून अनेक ग्राहकांनी आयकियाला भेट देण्याचा कार्यक्रम आधीच निश्चित केला होता. पाहता पाहता आयकियामध्ये इतकी गर्दी उसळली, की ग्राहकांना स्टोअरमध्ये प्रवेश करणे अश्यक्य होऊन बसले. या वेळी स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्राहकांना किती प्रतीक्षा करावी लागणार आहे हे कळण्यासाठी आयकियाच्या वतीने बाहेर ‘लाईव्ह टिकर टेप’ टीव्ही स्क्रीन्सवर सुरु ठेवण्यात आली होती. यामुळे ग्राहकांना आपल्या वेळेचे नियोजन करता यावे, तसेच स्टोअरच्या आतील ग्राहकांची गर्दी सांभाळणे सोपे व्हावे, असा त्यामागील दुहेरी हेतू होता.

जगभरामध्ये सुमारे चाळीस देशांमध्ये आयकियाची स्टोअर्स असून, हैदराबाद येथील आयकिया हे भारतातील पहिलेच स्टोअर आहे. १५ ऑगस्ट सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी आयकियामध्ये ग्राहकांची गर्दी असणे साहजिकच होते. या दिवशी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास टिकर टेपनुसार आयकियामध्ये प्रवेश करण्यासाठी ग्राहकांना दोन तास वाट पहावी लागत होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला गर्दी आणखी वाढल्याने वाट पाहण्याचा कालावधीही वाढला. ज्या दिवशी आयकियाचे उद्घाटन झाले, त्यादिवशी तब्बल ४०,००० ग्राहकांनी खरेदीनिमित्त स्टोअरला भेट दिली असल्याचे समजते. त्यामुळे त्या दिवशी स्टोअरच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा आणि अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील पाहायला मिळाली.

आयकियाचे इतके आकर्षण लोकांना वाटण्याचे कारण म्हणजे आयकियाने आपल्या नव्या स्टोअरचे केलेले प्रमोशन. गेला महिनाभर वर्तमानपत्रांतून झळकणाऱ्या जाहिराती, रस्त्यांवर पाहायला मिळणारी मोठमोठी होर्डींग्ज, सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जाहिराती असे प्रमोशन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. शिवाय आयकिया हा ब्रँड जागतिक पातळीवरील नामांकित ब्रँड असल्याने या स्टोअरला भेट देण्याचे ग्राहकांचे औत्सुक्य स्वाभाविकच होते.

Leave a Comment