उर्दू लेखिका इस्मत चुगताईं यांना गुगलची मानवंदना

ismat-chungati
आज प्रख्यात भारतीय उर्दू लेखिका, नाटककार, विचारवंत इस्मत चुगताई यांचा जन्मदिन असून आपल्या प्रतिभाशाली लेखनीतून कथा, कादंबऱ्या, नाटक आणि चित्रपटांचे २१ ऑगस्ट १९१५ साली जन्मलेल्या चुगताई यांनी लिखाण केले. त्यांचा साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. गुगलने आज त्यांच्या १०७ व्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ डूडल बनवले आहे.

इस्मत चुगताई यांच्या घरचे एकूण वातावरणच वाङ्‌मयीन होते. त्यांचा भाऊ अझीम बेग हा एक प्रसिद्ध विनोदी लेखक होता. उर्दू तसेच इंग्रजी व रशियन साहित्याचे इस्मत चुगताईंनी विपुल वाचन केले. त्यांनी बर्नार्ड शॉच्या लेखनाने प्रभावित होऊन फसादी हे आपले पहिले नाटक लिहिले. आपल्या सुरुवातीच्या कथा अश्लील वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच फाडून टाकल्या; परंतु नंतरच्या कथांपैकी काही त्यातील धिटाई आणि वाङ्‌मयीन गुण यांमुळे लोकप्रिय झाल्या.

लाहोरच्या न्यायालयात त्यांच्या ‘लिहाफ’ नामक कथेवर अश्लीलतेचा खटला भरण्यात आला होता. ‘लिहाफ’ या कथेतल्याप्रमाणे आपल्या लेखनात त्या लैंगिक प्रसंगांचे व अनैतिक संबंधांचे निर्भीडपणे चित्रण करतात. त्यांचे मध्यमवर्गीय मुस्लिम युवतींच्या मानसिक अवस्थेचे निरीक्षण सूक्ष्म आणि सखोल आहे. त्या प्रेम आणि वासना यांच्याबद्दलच्या रूढ कल्पनांचा उपहास करतात. त्यांनी ‘बहुबेटिया’ मध्ये आपल्या विवाहपद्धतीचा उपहास करून वैवाहिक संबंधातील विसंवादाची सूचक मीमांसा केलेली आहे. इस्मत चुगताईंना सौंदर्य, स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक रूढी आणि संकेत यांसंबंधीच्या आजच्या विचारपद्धतीत क्रांतिकारक बदल करावयाचा आहे. पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीजीवनाची शोकात्म बाजूच आपल्या कथाकादंबऱ्या लिहिण्यास त्यांना प्रेरक ठरली. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि व्याजोक्तिपूर्ण सूर यांमुळे त्यांच्या कथाकादंबऱ्यांना आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. उर्दू साहित्याच्या दुनियेत इस्मत आपा या नावाने परिचीत असलेल्या या विख्यात लेखिका २४ ऑक्टोबर १९९१ रोजी निधन झाले.

Leave a Comment