रात्री नऊनंतर एटीएममध्ये रोकड भरण्यास मनाई, नवे नियम जारी

atm
केंद्रीय गृह मंत्रालयाने एटीएममध्ये रोकड भरण्याबाबत नवीन नियम जारी केले असून त्यानुसार आता रात्री नऊनंतर एटीएममध्ये रोकड भरण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागांमध्ये ही मर्यादा आणखी अलीकडे आणण्यात आली असून तेथे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रक्कम भरण्यात येणार नाही.

स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स या नावाचे हे नियम 8 फेब्रुवारी 2019 पासून अमलात येणार आहेत. देशातील विविध ठिकाणी झालेल्या कॅश व्हॅन व कॅश व्हॉल्टवरील हल्ले, एटीएम मधील फसवणुकीच्या घटना तसेच अन्य घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

नवीन नियमांनुसार, नवीन नोटा घेऊन जात असताना दोन सशस्त्र सुरक्षा सैनिक संरक्षणासाठी असतील. नक्षलग्रस्त भागांमध्ये एटीएममध्ये रक्कम भरण्याची मुदत दुपारी चार वाजेपर्यंत असेल. तसेच रोकड रक्कम भरणाऱ्या संस्थांना दुपारपर्यंत बँकांतून रक्कम घेता येणार आहे.

संपूर्ण देशभरात खासगी मालकीच्या 8,000 कॅश व्हॅन आहेत. त्यांच्यामार्फत दररोज 15,000 कोटी रुपये बँकांच्या वतीने एटीएममध्ये भरण्यात येतात. काही ठिकाणी खासगी संस्था एटीएममध्ये रात्री पैसे भरतात. या गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक करण्यात आली असून एका फेरीमध्ये एका गाडीत पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Comment