ताऱ्यांच्या जन्म होण्याच्या प्रक्रियेच्या प्रतिमा मिळवण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश

nasa
वॉशिंग्टन – खगोलशास्त्रज्ञांना नासाच्या हबल स्पेस दुर्बिणीद्वारे ताऱ्यांच्या जन्म होण्याच्या प्रक्रियेच्या प्रतिमा मिळवण्यात यश आले असून अतिनील किरणांवर मात करत हबल स्पेस दुर्बिणीतून १५ हजार आकाशगंगा कवेत घेणाऱ्या १२००हून अधिक ताऱ्यांच्या जन्माचे परीक्षण करणे आता खगोलशास्त्रज्ञांना शक्य होईल.

कोणत्याच दुर्बिणीतून लाखो प्रकाशवर्ष दूर असलेल्या आकाशगंगेच्या प्रतिमा ज्या पूर्वी अतिनील किरणांमुळे पाहता येणे शक्य नव्हते, आता त्यांचा अभ्यास करणे नासाला शक्य होणार आहे. यामुळे जवळच्या व दूरच्या आकाशगंगेचा तुलनात्मक अभ्यास करून स्फोटातून निर्माण झालेल्या विश्वाच्या निर्मितीची प्रक्रिया उलगडणार आहे. शास्त्रज्ञांना यापूर्वी विश्वातील अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचत नसल्याने त्या पलीकडील आकाशगंगेचा अभ्यास करणे शक्य नव्हते. पण ही गोष्ट आता हबल स्पेस दुर्बिणीमुळे मानवाच्या आवाक्यात आली आहे.

हबल स्पेस दुर्बिणीतून यापूर्वी २०१४ सालीही या प्रतिमा पाहण्यात आल्या होत्या. पण यावेळेस १४ पटीने अधिक जवळून या प्रतिमा उपलब्ध झाल्या आहेत. शास्त्रज्ञांना या शोधामुळे विश्वाच्या उत्क्रांतीचे विविध टप्पे नव्याने अभ्यासता येतील. हबल स्पेस टेलिस्कोप प्रकल्प अमेरिकन अंतराळ संशोधऩ संस्था नासा व युरोपीयन अंतराळ संसोधन संघटनेचा संयुक्त प्रकल्प असून अंतराळ संशोधनाला नवे आयाम मिळवून देण्यात हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे.

Leave a Comment