यूट्यूबवरील बहुतांश व्हिडिओ दिशाभूल करणारे

youtube
न्यूयॉर्क – तुम्ही सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियेविषयी माहिती युट्यूबवर शोधत असाल तर तुम्हाला सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण, संशोधकांनी यापैकी बहुतांश व्हिडिओ दिशाभूल करणारे असून वैद्यकीय क्षेत्रातील अपुरे ज्ञान असणाऱ्या लोकांकडून हे व्हिडिओ तयार केले जातात, अशी माहिती दिली आहे.

लोक यूट्यूबला माहितीचा स्त्रोत मानतात. सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियेविषयी जेव्हा काही लोक युट्यूबचा वापर करतात, तेव्हा त्यांना याबाबत चुकीची माहिती मिळते. ज्यामुळे त्यांची दिशाभूल होते. असे रटगर्स विद्यापीठातील संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.

निव्वळ मार्केटिंगसाठी यासंदर्भातील युट्यूबवरील हे व्हिडिओ तयार करण्यात आलेले असतात. त्यांचा हेतू लोकांना माहिती देऊन शिक्षित करणे हा नसतो, असे युनिव्हर्सिटीतील सहाय्यक प्राध्यापक बोरीस पाश्कोव्होर यांनी सांगितले. संपूर्ण टीमने या संशोधनासाठी २४० टॉप रेटेड व्हिडिओजची निवड केली होती. १६०मिलियन एवढे व्ह्यूज या व्हिडिओंना मिळाले होते. वेगवेगळ्या की-वर्ड्सच्या माध्यमातून या व्हिडिओजची निवड केली गेली होती.

याशिवाय लोकांनी पोस्ट केलेले व्हिडिओ, हेल्थ केअरकडून आलेले व्हिडिओ, रुग्ण किंवा इतर ठिकाणांहून आलेल्या व्हिडिओजचा संशोधकांनी अभ्यास केला होता. यातील बहुतांश व्हिडिओंमध्ये पात्र व्यक्तींचा समावेश नसल्याचे दिसून आले. जवळपास ९४ व्हिडिओ हे वैद्यकीय क्षेत्रातील कुठलाच अभ्यास नसलेल्या व्यक्तींनी बनवलेले होते. वैद्यकीय तज्ज्ञांकडून पोस्ट केले गेलेले व्हिडिओसुध्दा शैक्षणिक हेतूने बनवले जाऊ शकतात. पण त्यांचाही मार्केटिंगचाच उद्देश असतो, असे पाश्कोव्होर म्हणाले. यूट्यूबच्या माध्यमातून माहिती घेऊ पाहणाऱ्या डॉक्टर आणि रूग्णांना हे व्हिडिओ पक्षपाती किंवा चुकीची माहिती पुरवू शकतात, याची नोंद घेणे गरजेचे आहे. समोरील प्रशिक्षणार्थीच्या पात्रतेबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे पाश्कोव्होर यांनी सांगितले. मार्केटिंग करण्याचे यूट्यूब हे व्यासपीठ असून तुम्हाला काहीतरी विकण्याच्या हेतूनेच याप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करणारे लोक नेहमी या व्हिडिओंची निर्मिती करत असतात, असेही ते म्हणाले.

Leave a Comment