केरळमधील पूरात ताटातूट झालेल्यांचा शोध घेणार गुगल पर्सन फाइंडर

google
नवी दिल्ली – केरळमध्ये पूरात ताटातूट झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हरवलेल्या व्यक्तिंना शोधण्यासाठी गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर करण्यात येत आहे. तब्बल १६४ जणांनी केरळमधील पावसाच्या हाहाकारात प्राण गमावले आहेत. लाखो जण विस्थापित झाले आहेत आणि अजूनही १४ पैकी तब्बल १३ जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी आहे. ज्या भागात शेकडो लोकांची ताटातूट झाली आहे अशा पूरग्रस्त भागामध्ये गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर शक्य आहे.


डेस्कटॉप किंवा मोबाइलवरून लॉग ऑन करून हे टूल वापरता येते. हे टूल हरवलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी अथवा हरवलेल्या व्यक्तिची माहिती देण्यासाठी वापरता येते. सगळ्या लोकांसाठी हे टूल उपलब्ध आहे. हरवलेल्या व्यक्तिचे नाव येथे द्यायचे असते. यूजर नवीन रेकॉर्डही तयार करू शकतो. या व्यक्तिची उपलब्ध असलेली माहिती व असेल तर पत्ता गुगल लगेच देते. हरवलेल्या व्यक्तिची तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावही येथे देण्याची सोय आहे.

हरवलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्याचा प्रयत्न करू असे ट्विट करून गुगलने म्हटले आहे. त्यासाठी #personfinder: https://goo.gl/WxuUFp #KeralaFloods हा हॅशटॅग व लिंक गुगलने दिली आहे. गुगलने ही सेवा हैतीमधल्या भूकंपाच्यावेळी दाखल केली होती. तसेच उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलंयकारी पूराच्यावेळीही ही सुविधा गुगलनं भारतात दाखल केली होती. आता पुन्हा केरळमध्ये या सेवेचा लाभ गुगल देत आहे.

केरळ फ्लड लाइव्ह हे पेज सुरू करत आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी फेसबुकनेदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. फेसबुकचे २७ कोटी युजर्स भारतामध्ये असून सेफ्टी चेक फीचरही फेसबुकने दाखल केले आहे. मित्र व नातेवाईक सुखरूप आहेत की नाही हे यावरून कळण्याची सोय असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment