असा होता अटलबिहारी वाजपेयी यांचा जीवन प्रवास

atal-bihari-vajpayee
“लोकनेते असा नावलौकिक असलेले अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जायचे. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.

ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्‍त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला.

वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली परंतु अल्पावधीतच म्हणजेच 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता. समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेले वाजपेयी एक ख्यातनाम कवी आहेत. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाक कलेतही विशेष रस घेतात.

25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील (आताच्या मध्यप्रदेश राज्यात आहे) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छितात. 5000 वर्षांची ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या व आगामी 1000 वर्षांमध्ये येणारी आवाहने पेलण्यास तयार असलेल्या भारत देशाचे ते प्रतिनिधित्व करतात.

भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 1994 साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. एका उल्लेखानुसार, अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते.

अटलबिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास –
१९५१ – भारतीय जनसंघ, संस्थापक, सदस्य
१९५७- लोकसभा निवडणुकीत विजय
१९५७-७७ – भारतीय जनसंघाचे गटनेते
१९६२ – राज्यसभा सदस्य
१९६७ – चौथ्या लोकसभेत पुन्हा विजयी
१९६८-७३- भारतीय जनसंघाचे अध्यक्ष
१९७७-७९ – केंद्रीय विदेश मंत्री
१९८०-८६- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
१६ मे १९९६ ते ३१ मे १९९६ – पहिल्यांदा पंतप्रधान
१९९६-९७ – विरोधी पक्षनेता
१९९९- नवव्यांदा लोकसभेत
१३ ऑक्टोबर १९९९ ते १३ मे २००४- पंतप्रधान

Leave a Comment