श्रीदेवी आणि त्यांचे नायक, या जोड्या ठरल्या सुपरहिट

sridevo
एकीकडे श्रीदेवीची गणना बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत असतानाच, दुसरीकडे अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, ऋषी कपूर, विनोद खन्ना, यांच्या सारखे अभिनेते यशाचे शिखर गाठीत होते. त्याकाळी राजेश खन्ना यांनीही थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन केले होते. त्या काळी बॉलीवूड खरे तर पुरुषप्रधान किंवा नायक प्रधान संस्कृती असलेली दुनिया असली, तरी श्रीदेवी अव्वल दर्ज्याची कलाकार असून, नायकप्रधान संस्कृतीमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत असल्याचे राजेश खन्ना म्हणत असत. श्रीदेवीने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक नायकांबरोबर भूमिका साकारल्या. काही नायकांच्या बरोबरची तिची ‘केमिस्ट्री’ अभूतपूर्व होती, आणि म्हणूनच त्या जोड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
sridevo1
श्रीदेवीने ऋषी कपूर यांच्याबरोबर अनेक चित्रपट केले. या मध्ये ‘नगीना’ आणि ‘ चांदनी’ या चित्रपटांनी यशाचे शिखर गाठले. या चित्रपटांचे कथानक आणि मुख्य म्हणजे संगीत प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. श्रीदेवीने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जोडीनेही अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या चित्रपटांपैकी ‘खुदा गवाह’ हा चित्रपट गाजला. पण त्यानंतर मात्र हे दोघे मातब्बर कलाकार एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली नाही.
sridevo3
श्रीदेवी आणि अनिल कपूर यांनी तेरा चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असल्या तरी यामधील केवळ पाचच चित्रपट यशस्वी होऊ शकले. यामध्ये ‘कर्मा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘लाडला’, ‘जुदाई’, आणि ‘जाँबाझ’ हे चित्रपट गाजले. मात्र ‘लम्हे’ सारख्या चित्रपटाचे कथानक उत्तम असून, आणि यामध्ये भूमिका केलेल्या सर्वच कलाकारांच्या भूमिका उत्तम असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. अनिल कपूर बरोबरचे श्रीदेवीचे इतर चित्रपटही प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत. श्रीदेवी आणि जितेंद्र याची ‘हिम्मतवाला’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरून दर्शकांना यांची जोडीही पसंत पडली होती.