भरकटलेला जॉनचा ‘सत्यमेव जयते’

satya-mev-jayte
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बॉक्स ऑफिसवर काल भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात देण्यात आलेल्या लढ्यावर आधारित ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पोलिस फोर्समधील करप्शनवर मिलाप झवेरी यांच्या या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

वीर (जॉन अब्राहम) हा एक कलाकार आहे, पण त्यासोबतच तो एक किलर देखील आहे. तो भ्रष्ट पोलिसांना जाळून मारतो आणि मेल्यानंतर त्यांचे स्केच बनवतो. जेव्हा त्याला पकडण्यात पोलिस फोर्स अपयशी ठरते, तेव्हा इन्स्पेक्टर शिवांश (मनोज बाजपेयी) ची या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती केली जाते. किलर वीरला पकडण्याचा प्रयत्न शिवांश करत असतो, पण पोलिसांना मारण्याचा क्रम वीर सुरु ठेवतो. वीर किलर का बनतो, हेदेखील या कथेत दाखवण्यात आले आहे.

खरं तर पोलिस डिपार्टमेंटमध्ये असलेल्या भ्रष्ट पोलिस अधिका-यांना पोलिस फोर्समधून बाहेर काढण्याचा वीरचा उद्देश आहे. डीसीपी शिवांश राठौर एक प्रामाणिक पोलिस ऑफिसर आहे, किलरच्या डोक्यात सुरु असलेल्या योजनेपर्यंत जो पोहोचतो. पण यानंतर काय घडायला हवे, हे लिहायला कदाचित स्क्रिप्टराइटर विसरले. दमदार सुरुवात झाल्यानंतर एका वळणावर चित्रपट भरकटत जातो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि विषयात दम नाही. मिलाप झवेरी यांचेच दिग्दर्शन आणि पटकथा आहे. चित्रपटातील त्यांच्या सिग्नेचर डायलॉगने चित्रपटाला हास्यास्पद बनवले आहे. चित्रपटाचे संवाद गंभीर दृश्यातदेखील फनी वाटतात. चित्रपटाच्या विषयाकडे गांभीर्याने बघणे प्रेक्षकांसाठी अशक्य बाब आहे.

नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न जॉन अब्राहमने केला आहे. पण त्याच्या अभिनयाचा दिग्दर्शकाला फायदा करुन घेता आलेला नाही. त्याचे किलिंगपासून रोमान्सपर्यंत एक्सप्रेशन्स सारखेच आहेत. फक्त तो पंच मारताना अभिनय करत आहे, असे वाटते. हीरोईन शिखा (आएशा शर्मा) ला जगातील सर्वात चांगल्या तरुणीच्या रुपात मिलाप झवेरी यांनी सादर केले आहे. ती प्राण्यांची काळजी घेते. समुद्र किना-यांवर स्वच्छता राखते, एनजीओच्या मुलांना शिकवते आणि सोबतच पेटिंगदेखील करते. आएशा शर्माने तिच्या वाट्याला आलेली भूमिका योग्यरित्या साकारली आहे. मनोज बाजपेयीचेही काम उत्तम झाले आहे. शिवांशच्या पत्नीच्या भूमिकेत अमृता खानविलकरची भूमिका अतिशय लहान आहे. याशिवाय आतिफ असलमचा ‘पानियों सा’ हा देखील चांगला ट्रॅक आहे. इतर गाणी ठिकठाक झाली आहेत. एकंदरीतच हा चित्रपट पाहण्यासाठी आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका.