आपले छाती अभिमानाने भरून येणारी ही आहेत ७ सर्वाधिक लोकप्रिय देशभक्तीपर गीते

song
सर्वत्र चैतन्य निर्माण करणारा, देशभक्तीने वातावरण भारावून टाकणारा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. या देशभक्तीच्या लाटेवर स्वार होताना लहान थोर, गरीब, श्रीमंत सर्वच दिसतात. देशप्रेमाचा संचार शाळा कॉलेजेस पासून ते सर्वप्रकारच्या कार्यालयातून जाणवत असतो. त्याचबरोबर लोकांना अभिमान वाटावा अशी चित्रनिर्मिती करुन गेली अनेक वर्षे हिंदी सिने सृष्टीने देखील यात आपले योगदान दिले आहे.

एक मोठी यादीच देशभक्तीपर चित्रपटांची तयार होईल एवढे चित्रपट हिंदीत बनले आहेत. पण ज्यांचा प्रभाव अद्यापही प्रेक्षकांच्यावर आहे असे चित्रपटही आहेत. यात शहिद, हकिकत, बॉर्डर, मनोजकुमार यांचा उपकार ते क्रांतीपर्यंतचे चित्रपट तर आहेतच. पण नव्या पिढीला देशभक्तीची जाणीव देणारे रंग दे बसंती, लिजंड ऑफ भगतसिंगसारखे चित्रपटही आहेत. या चित्रपटामधून सर्वात आवडता एक चित्रपट निवडणे कठीण आहे. या चित्रपटांचा जेव्हा विचार होतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा स्मरणात राहतात ती यातली गाजलेली देशभक्तीपर गाणी. अशीच ठेवणीत ठेवण्याजोगी गाणी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

१९६७ साली आलेल्या उपकार या चित्रपटातील मेरे देश की धरती हे गाणे. हा चित्रपट मनोज कुमार यांचा पदार्पणातील दिग्दर्शकीय चित्रपट होता. या चित्रपटात माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या घोषणेचा संदर्भ आहे. कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबध्द केलेल्या या गीतासाठी गुलशन बावरा यांना फिल्मफेअरचे बेस्ट लिरीक्सचे अॅवॉर्ड मिळाले होते.

भगतसिंगाच्या जीवनावरील आधारित १९६५ साली आलेल्या चित्रपटातील ए वतन वतन हे गीत प्रचंड लोकप्रिय आहे. या चित्रपटाची निर्मिती केवल कश्यप यांनी केली होती आणि एस. राम शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. मनोज कुमार, कामिनी कौशल, प्राण, इफ्तेकार, निरुपा रॉय यांच्या यात मुख्य भूमिका होत्या. हे गाणे प्रेम धवन यांनी संगीतबध्द केले होते. राम प्रसाद बिस्मिल यांनी हे गीत रचले होते.

१९६१ साली आलेल्या हम हिंदूस्थानी या चित्रपटातील छोडो कल की बाते गाण्याने तरुणांना देशसेवेसाठी आकर्षित केले. प्रेम धवन यांनी लिहिलेल्या या गीताला उषा खन्ना यांनी संगीत दिले होते.

रंग दे बसंती हा एक युथफुल चित्रपट होऊन गेला. यात तरुणाईला पुन्हा देशभक्तीकडे वळवणारा विषय होता. आजच्या काळात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यासाठी करावा लागणारा दुसऱ्या स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष यात चित्रीत करण्यात आला होता. याचे शीर्षक गीत शहिद भगतसिंग यांच्या मेरा रंग दे बसंती चोला या गाण्यावर आधारित होते.

१९६४ साली हकिकत हा भारत चीन युध्दावर आधारीत चित्रपट आला होता. यात धर्मेंद्र, बलराज सहानी, संजय खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील हे गाजलेले कर चले हम फिदा हे गाणे मदन मोहन यांनी संगीतबध्द केले होते आणि मोहम्मद रफी यांनी गायले होते.

भारतीय संगीताचे जादुगार ए. आर. रहमान यांनी भारत हम को जान से प्यारा है हे गीत रोजा या चित्रपटासाठी संगीतबध्द केले आणि एका रात्रीत हे गाणे लोकांच्या आवडीचे झाले. काश्मिरच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेले हे गाणे हरीहरण यांनी गायले होते.

ऐ मेरे वतन के लोगो हे गीत भारताच्या देशभक्तीपर गाण्यांच्या यादीत सर्वात अव्वल स्थानवरचे गीत आहे. १९६३ साली लता मंगेशकर यांनी हे गीत स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन गायले होते. भारत आणि चीनमध्ये झालेल्या युध्दाची या गीताला पार्श्वभूमी होती. युध्दात शहिद झालेल्या जवानांच्या पराक्रमाची आठवण करुन देणारे हे गीत जेव्हा लताबाईंनी सादर केले तेव्हा उपस्थितांसह तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या डोळ्यातही अश्रू दाटले होते. जन गण मन या राष्ट्रगीता इतकेच हे गाणे लोकप्रिय आहे. यासोबत वंदे मातरम आणि सारे जहाँ से अच्छा ही गाणी लोकप्रिय देशभक्तीपर गीते आहेत.