राधे माँवर आधारित वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च

radhi-ma
आता छोट्या पडद्यावर स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु ‘राधे माँ’ एन्ट्री घेत असून सर्वसामान्य लोकांपासून अगदी टेलिव्हिजन क्षेत्रातही राधे माँचे अनुयायी आहेत. राधे माँ आता याचाच फायदा घेत, ‘राह दे माँ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

ज्या वेब सीरिजमध्ये राधे माँ काम करत आहे, ती काही धार्मिक किंवा आध्यात्मिक सीरिज नाही, हे मुद्दाम इथे नमूद करायला हवे. कारण अनेकांनी गृहित धरले असणार की, राधे माँ काम करणार म्हटल्यावर धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असेल. पण तसे नाही. राधे माँने वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमातही आपला वेगळेपणा दाखवला. राधे माँ ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमात अगदी ‘मॉडर्न लूक’मध्ये पोहोचली. राधे माँच्या आयुष्यावर आधारित ही वेब सीरिज असल्याचे कळते आहे.

ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमातील राधे माँचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे या फोटोबाबत अनेकजण तर्क लढवत होते. पण या कार्यक्रमातील हे फोटो असल्याचे आता उघड झाले आहे. राधे माँच्या आयुष्यातील चढ-उतार या वेब सीरिजमधून दाखवले जाणार आहेत. ही वेब सीरिज तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर आधारित असेल. ‘राह दे माँ’ या वेब सीरिजची निर्मिती स्वत: राधे माँ करत आहे. त्याचसोबत राधे माँ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकाही साकारत आहे.