गुगलने मला दोनदा नाकारल्यामुळे झाला फ्लिपकार्टचा जन्म

binny-bansal
बेंगळुरमध्ये एका कार्यक्रमामध्ये मनमोकळ्या गप्पा मारताना खेळीमेळीच्या वातावरणात आत्तापर्यंत अज्ञात असलेल्या गोष्टी फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिनी बन्सल यांनी शेअर केल्या आणि सहभागींशी हास्य विनोद करत गप्पा मारल्या. त्यावेळी बोलताना बिनी बन्सल यांनी मला दोन वेळा गुगलने नाकारले आणि फ्लिपकार्टचा जन्म झाल्याचे गमतीशीर पद्धतीने म्हटले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बड्या स्पर्धकांना बिनी बन्सल व सचिन बन्सल या सहसंस्थापकांनी टक्कर दिली आणि फ्लिपकार्ट ही कंपनी नावारूपाला आणली. बन्सल यांनी सध्या व्यवसायात असलेल्या आव्हानाबद्दल बोलताना मिश्किलपणे सांगितले, की फळ व भाज्या बिग बास्केटमधून न मागवता फ्लिपकार्टवरून मागवण्यासाठी पत्नीला कसे राजी कराचे हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. माझी पत्नी रोज ऑनलाइन जाते आणि बिग बास्केटवरून खरेदी करते. तिला मी सांगतो की तू एकदा तरी आपल्या ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी करून बघ. पण मी अजून तरी तिला यासाठी पटवण्यात यशस्वी झालेलो नसल्याचे प्रांजळपणे बन्सल सांगतात.

बन्सल बंधुंनी ग्राहकांबद्दल नीट माहिती घेता यावी म्हणून स्वत: ग्राहकांच्या दारी जाऊन सामान पोचवले आहे. आम्हाला काही जणांनी ओळखलेच नाही आणि डिलीव्हरी बॉयशी वागतात तसे वागले, पण काहींनी ओळखले आणि त्यांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतल्याची आठवण बन्सल यांनी सांगितली.

बन्सल एक हास्यास्पद घटना सांगताना म्हणाले, मला ग्राहकांनी एका डिलीव्हरीच्या वेळी ओळखल्यानंतर मला ते सोडायलाच तयार होईना. त्यांनी मला घरी आलेल्या पाहुण्यासारखी राजेशाही वागणूक दिली. माझ्यावर संपूर्ण कुटुंबच चहा आणि मिठाईचा मारा करत राहिले, हे सांगताना पण काय करणार ग्राहक हा शेवटी राजा असतो आणि त्यामुळे मी ते सगळे सहन करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नसल्याचे बन्सल यांनी सांगितळे. आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेतलेल्या बन्सल यांनी शाळेत असताना माझे खेळावर जास्त प्रेम होते आणि मी अभ्यासात बेताचाच असल्याचे प्रांजळपणे सांगितले.

Leave a Comment