लॉर्ड्सवर क्रिकेटच्या ‘लॉर्ड’शी रणवीरची ग्रेटभेट

ranveer-singh
भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यामध्ये क्रिकेटची पंढरी असेलल्या लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे क्रिकेटपटूंसोबतच चाहत्यांचीही घोर निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. पण क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील दोन दिग्गज व्यक्तींची भेट याच पावसाच्या निमित्ताने झाल्याचे पाहायला मिळाले.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने भारत- इंग्लंड यांचा सामना पाहण्यासाठी आणि भारताला प्रोत्साहन देण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर हजेरी लावली होती. पण रणवीरला हा सामना ऐनवेळी आलेल्या पावसामुळे पाहता आला नाही. रणवीरच्या नशिबात त्यामुळे हा सामना पाहणे नसले तरी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याची भेट घेणे होते. त्यानुसार रणवीर आणि सचिन यांची या ठिकाणी भेट झाली. सोशल मीडियावर या भेटीचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत.


या मैदानावरील दोन फोटो रणवीरने शेअर केले असून तो एका फोटोमध्ये एकटाच दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर सचिन तेंडूलकर आणि चित्रपट दिग्दर्शक कबीर खान दिसून येत आहे. रणवीरप्रमाणेच काही फोटो कबीरनेही शेअर केले असून त्याला साजेसे कॅप्शन देखील दिले आहे.