विमानांमध्ये प्रवाश्यांच्या सोबत ‘ही’ मंडळी देखील !

animal
विमान प्रवासाला निघालेले प्रवासी अनेकदा आपल्यासोबत अनेक चित्रविचित्र वस्तू नेल्याने अडचणीमध्ये आल्याचे आपण पाहतो, ऐकतो. सोन्या-चांदीची, दुर्मिळ वस्तूंची, अंमली पदार्थांची किंवा अगदी जनावरांची तस्करी प्रवाश्यांच्या मार्फत केली जात असल्याची अनेक उदाहरणे आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. ही तस्करी बहुतेक वेळी लपून छपून केली जात असते. पण अनेकदा अश्या ही घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये प्रवाश्यांनी सोबत चक्क प्राणी विमानामध्ये, अगदी रीतसर तिकिटे काढून नेले आहेत. पाळीव कुत्री किंवा मांजरींना विमानातून प्रवास करताना सोबत घेऊन जाणारे अनके प्रवासी पाहायला मिळतात. पण फाल्कन्स, किंवा क्वाला बेअर ही प्राणी मंडळी देखील विमानामध्ये प्रवास करू लागली आहेत.
animal1
‘द गार्डियन’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सौदी अरेबियाच्या राजकुमाराने आपल्या सोबत ऐंशी फाल्कन पक्षी नेण्यासाठी विमानातील ऐंशी सीट्स आरक्षित केल्या. फाल्कन हा संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्रीय पक्षी आहे. तसेच फाल्कन पाळणे हे अरब देशांमध्ये वैभवाचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे ऐंशी फाल्कन पाळणारा आणि त्या फाल्कनना नेण्यासाठी विमानातील ऐंशी सीट्स आरक्षित
करणारा हा राजकुमार किती धनाढ्य असेल, याची कल्पना आपण सहज करू शकतो.
animal2
हॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपट ‘स्नेक्स ऑन द प्लेन’ या चित्रपटाचे कथानक प्रत्यक्षात उतरविणारी घटना एरोमेक्सिकोच्या मेक्सिकोला जाणाऱ्या विमानामध्ये घडली. विमानाने मेक्सिकोला जाण्यासाठी उड्डाण केले असता, वरच्या केबिन बॅगेज कंपार्टमेंटमधून अचानक एक भला मोठा हिरवा साप प्रकट झाला. हा साप अचानक अवतरल्यामुले विमानात काय आणि किती गोंधळ आणि घबराट पसरली असेल, याची कल्पना आपण करू शकतो. अखेरीस विमानातील कर्मचाऱ्यांनी या सापाला पकडण्यात यश मिळविले. या विमानाला ‘प्रायॉरिटी लँडिंग’ देण्यात येऊन जेव्हा वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सापाला ताब्यात घेतले, तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आला. हा साप विमानामध्ये आला कसा याचा शोध घेण्यासाठी एअरलाईन कंपनीच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे.
animal3
नॉर्थ करोलिनाला जाणाऱ्या विमानामध्ये प्रवाश्यांच्या सोबत एक पाहुणाही होता. डॅनियल नावाचे बदक या विमानातून प्रवास करीत होते. हे बदक खास अपंग व्यक्तींना भावनिक आधार ( इमोशनल सपोर्ट )देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले बदक होते. तसेच वर्जिन आयलंड्सची रहिवासी असलेली मेगन पीबॉडी हिने आपला पाळीव डुकरासोबत केलेल्या विमान प्रवासाची छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली होती. हे दोघे अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करीत होते. हॅमलेट नावाच्या या डुकराला विमान प्रवासाची चांगलीच सवय असून, बोस्टनला आपल्या परिवारासोबत नाताळ साजर करून मेगन आणि हॅमलेट आपल्या घरी परतत असतानाच्या प्रवासातील ही छायाचित्रे आहेत.
animal4
ऑस्ट्रेलियाहून सिंगापूरला जाणाऱ्या क्वांटस एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करण्याचा आनंद नुकताच चार क्वाला बेअर्सनी घेतला. पॅडल, पेलीटा, चॅन आणि इडालिया नामक ही चार क्वाला बेअर्स, सिंगापूरच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्या देशाला भेट म्हणून पाठविण्यात आली होती. क्वांटस एअरलाईन्सच्या वतीने विमान प्रवासाचा आनंद घेत असलेल्या या क्वाला बेअर्सची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या वेळी या अस्वलांना निलगिरीची पाने, आणि त्यांच्या आवडीचे इतर पदार्थ एअरलाईन्सच्या वतीने उपाहार म्हणून पुरविण्यात आले होते. त्यानंतर खास या अस्वलांसाठी तयार करण्यात आलेल्या सेफ्टी कंटेनर्स मध्ये या अस्वलांची पाठवणी करण्यात आली.

Leave a Comment