किराणा मालाच्या मार्केटमध्ये आता फ्लिपकार्टचाही प्रवेश

flipkart
ऑनलाईन मार्केटमध्ये मोबाईल, इलेक्र्टॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी सध्या जोरदार स्पर्धा सुरु असून अगदी छोट्याशा एखाद्या वस्तूपासून ते मोठ्या गुंतवणूकीपर्यंत अनेक व्यवहार मागच्या काही काळात ऑनलाईन करण्याचा ट्रेंड आला आहे. आता यामध्ये आणखी एक भर पडली असून किराणा मालाच्या मार्केटमध्येही स्पर्धा वाढली आहे. या बाजारात फ्लिपकार्टनेही प्रवेश केला आहे. स्वयंपाकघरात लागणाऱ्या सर्व गोष्टी याठिकाणी नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. कंपनी या प्रकल्पासाठी २६.४ कोटी डॉलरची गुंतवणूक करत असून पुढील तीन वर्षांसाठी ती असेल असे सांगण्यात येत आहे.

फ्लिपकार्टचे किराणा विभागाचे प्रमुख मनीश कुमार याबाबत म्हणाले, किराणा ही अशी गोष्ट ज्याठिकाणी लोक जास्तीत जास्त पैसे वाचवायला पाहतात. आमच्या येथे त्या लोकांना अतिशय चांगल्या ऑफर्सचा लाभ घेता येईल. हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी बंगळुरुमध्ये लाँच केला आहे. याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हा व्यवसाय वाढविण्याच्यादृष्टीने या वर्षाच्या अखेरीस कंपनी दिल्ली, चेन्नई आणि हैद्राबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपली ही सेवा उपलब्ध करुन देणार आहे. सध्या अन्न विभागातील आपला व्यवसाय ग्रोफर्स आणि बिग बास्केट, अॅमेझॉनसारख्या कंपन्या वाढवत आहेत. आता फ्लिपकार्टची त्यात भर पडली आहे. फ्लिपकार्ट आपले वेगळे स्थान निर्माण करेल यात शंका नाही.

Leave a Comment