ऑनलाईन वित्तसेवेत फेसबुकची उडी


नवी दिल्ली – सोशल मीडियात अव्वल स्थानी असलेल्या फेसबुकवर अगोदरच यूजर्सचा डाटा चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे शंकेच्या गर्तेत अडकलेला असतानाच आता ग्राहकांच्या बँक खात्यावर फेसबुकची नजर आहे. फेसबुकने ऑनलाईन वित्तसेवेत उतरण्याचा निर्णय घेतला असून युजर्सच्या बँक खात्यांबद्दलच्या माहितीची विचारणा चेझ, जेपी मॉर्गन, सिटीबँक आणि वेल्स फार्गो या प्रमुख बँकांकडे त्यासाठी करण्यात आली आहे. फेसबुकने यावर स्पष्टीकरण दिले असून बँकांकडे ग्राहकांना सोयीच्या वित्तीय सेवा पुरवण्यासाठी या माहितीची विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

फेसबुक बॅंकांकडून बँक कार्ड व्यवहार, खात्यातील शिल्लक, ऑनलाईन खरेदीबाबतची माहिती मागवून घेत आहे. युजर्सकडून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. पण फक्त मेसेंजर अॅपद्वारे ही माहिती ग्राहकांना थेट बँकेशी संवाद साधता यावा या उद्देशासाठी गोळा केली जात असून या माहितीचा वापर मेसेंजर वगळता अन्य कोठेही करण्यात येणार नसल्याचा खुलासा फेसबुकने केला असल्यामुळे युजर्सना दिलासा मिळाला आहे. बँका आणि त्यांच्या ग्राहकांमधील संवादाचा दुवा म्हणून या अॅपद्वारे फेसबूक काम करणार आहे.

दरम्यान फेसबूकने सोमवारी वॉल स्ट्रीट जर्नलमधे प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे खंडन केले आहे. आम्ही ऑनलाईन वित्तसेवा पुरवणाऱ्या इतर कंपन्याप्रमाणेच बँका व क्रेडीट कंपन्यांसोबत माहितीचे आदानप्रदान केले आहे. तसेच बँकांच्या मदतीने ग्राहकांना दर्जेदार वैयक्तिक वित्तीय सेवांचा अनुभव देण्यासाठी मेसेंजर सेवा उपयुक्त असल्याचेही फेसबुकने म्हटले आहे. यूजर्सच्या परवानगीनेच हे अॅप वापरले जात असून यूजर्सला कोणतीही माहिती देण्यास बंधनकारक नसेल. याशिवाय ही माहिती इतर कुठल्याही उद्देशासाठी वापरली जाणार नसल्याचा निर्वाळा फेसबुकने दिला. मेसेंजरद्वारे ही वित्तीय सेवा प्रायोगिक तत्वांवर फक्त अमेरिकेत फेसबुकने सुरू केली असली तरी ही सेवा लवकरच भारतासह जगभरात लागू होणार आहे.

Leave a Comment