अनोखा विश्वविक्रम; भारतीय शेतकऱ्याने घेतले ५१ इंच लांब काकडीचे उत्पन्न


जगातील सर्वात लांब आकाराच्या काकडीचे उत्पन्न ब्रिटनमधील डर्बी शहरामधील एका भारतीय आजोबांची आपल्या गार्डनमध्ये घेतले असून भारतातून १९९१ साली ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या रघबीर सिंग संघेडा यांनी १२९ सेंटीमीटर लांब (५१ इंच) काकडीचे उत्पन्न आपल्या ग्रीनहाऊसमध्ये घेतले आहे. ब्रिटनमधील इयान नेल या व्यक्तीच्या नावावर या आधीचा सर्वात लांब काकडी उगवण्याचा विक्रम होता. २०११ साली ४२.१३ इंच लांब काकडीचे उत्पन्न इयान नेल यांनी घेतले होते.

या विक्रमसाठी रघबीर सिंग यांनी आपल्या मेहनतीबरोबरच प्रार्थनाही उपयोगात असल्याचे सांगितले. जगातील सर्वात लांब काकडीचे उत्पन्न मला घेता यावे यासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करायचो अशी माहिती रघबीर यांनी दिली. स्थानिक गुरुद्वारेत ते ग्रंथ वाचनाचे काम करतात तसेच आपली शेतीची आवड त्यांनी ब्रिटनमध्ये गेल्यानंतर ग्रीनहाऊसच्या माध्यमातून जपली आहे. या काकडीने विक्रम मोडला असला तरी या काकडीची लांबी अजूनही वाढत असल्याचे रघबीर यांनी सांगितले.

रघबीर यांनी जगातील सर्वात लांब काकडीचे उत्पन्न घेण्याचा विक्रम नावावर झाल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांना या काकडीच्या उत्पन्नाबद्दलची माहिती दिली. रोज ग्रीनहाऊसमध्ये जाऊन मी काकडीची लांबी किती वाढली हे पहायचो. अनेकदा मी देवाकडे प्रार्थना करायचो की दिवसोंदिवस या काकडीचा आकार वाढत रहावा. सध्या काकडीची लांबी वाढत असल्याने अद्याप मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे यासंदर्भात मी काहीही अर्ज केला नसल्याचे सांगतानाच काकडीचा आकार वाढण्याचे थांबले की मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे या काकडीची नोंद करेल अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment