चला त्रिपुराच्या सहलीवर


भारताच्या ईशान्येला असलेले त्रिपुरा हे राज्य आता पर्यटनाच्या नकाशावर येऊ लागले आहे. हे पहाडी राज्य भारताची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकर हिची जन्मभूमी. संस्कृती, वारसा आणि इतिहास त्याचबरोबर निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी या राज्याची सफर नक्कीच करायला हवी. येथील सुंदर सरोवरावर थंडीच्या दिवसात अनेक प्रवासी पक्षी मुक्कामाला येतात. राजधानी अगरतला तसेच अन्य शहरातून संस्कृती आणि स्मारके यांची रेलचेल पाहायला मिळते.


अगरतला हि १७६० साली त्रिपुरा राजघराण्याची राजधानी बनली. राजा कृष्णमाणिक्य याने ५५ किमी वर असलेल्या उदयपुर येथून राजधानी अगरतलाला आणली. महाल, रस्ते, तलाव यांची बांधकामे केली गेली. १८३८ साली बांधला गेलेला उज्जयंत महाल वास्तू सौंदर्याचा अप्रतिम नमुना असून तो भारतीय आणि अरबी वास्तूकलेचे दर्शन घडवितो. प्रचंड मोठा घुमत, लांब लांब ओवऱ्या आणि कोरीव दरवाजे पाहण्यासारखे. आता येथे संग्रहालय केले गेले असून राजाचे वंशजही येथे राहतात. येथील हस्तिदंती सिंहासन कलेचा अजोड नमुना आहे.


पुष्पवंत महाल, नीरमहाल हे साधारण ५० किमी अंतरावर आहेत. पैकी नीरमहाल रुद्रसागर तलावात बांधला गेला असून रात्री रोषणाईने झगमगून उठतो. या तलावात अनेक प्रकारची कमळे आहेत आणि विविध पक्षी येथे पाहायला मिळतात. येथे अनेक हिंदू व वैष्णव मंदिरे असून त्यातील त्रिपुरसुन्दरी मंदिर प्रसिद्ध आहे. कालीमातेचे हे मंदिर ५१ शक्तीपिठातील एक आहे. उदयपुर येथे हे मंदिर आहे.

याशिवाय दक्षिण भारतीय शैलीतील जगन्नाथ मंदिर, चतुर्दश देवता हे १४ देवीना समर्पित असलेले मंदिर आवर्जून पाहावे असे आहे.

Leave a Comment