नासाच्या क्युरीऑसिटी रोव्हरने मंगळावर साजरा केला सहावा वाढदिवस


वॉशिंग्टन – नासाने मंगळावर संशोधनासाठी क्युरीऑसिटी रोव्हर पाठविला होता. नुकताच क्युरीऑसिटी रोव्हरने मंगळावर आपला सहावा वाढदिवस साजरा केला आहे. नासाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली.

सहा वर्षाआधी मी याच दिवशी मंगळ ग्रहावर पहिले पाऊल ठेवले होते. रेड प्लॅनेटवरील संशोधनात आढळून आलेले लोह तसेच ऑक्सीजनसदृश घटक हे माझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट आहे. क्युरीऑसिटी रोव्हरला जगभरातील ट्विटर युजर्सनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या सहा वर्षाच्या संशोधनाचे कौतुक आणि एकांतासाठी सहानुभूतीही ट्विटर युजर्सकडून व्यक्त करण्यात आली.

क्युरिऑसिटी रोव्हरला शुभेच्छा देताना सिमोन एस. या ट्विटर युजरने म्हटले, की आम्हीही एक दिवस त्या धूळीने माखलेल्या ग्रहावर येऊ. तुला एक घट्ट मिठी मारू आणि मोठी बर्थडे पार्टीही करू. लवकरच तुमच्या सेवानिवृत्तीच्या काळाबाबतही माहिती द्या. जेणेकरुन तुमच्या संशोधनकार्याचा गौरव एखाद्या संग्रहालयाच्या निर्मितीद्वारे करण्यात येईल. येणाऱ्या कित्येक पिढ्या तुम्हाला या संग्रहालयात बघून तुमच्या संशोधनातून प्रेरणा घेतील.

२०१२ मध्ये मंगळ ग्रहाच्या गेल क्रेटर या भागात नासाने क्युरीऑसिटी रोव्हरला पाठवले होते. या रोबोटने ग्रहाची पूर्ण माहिती आणि छायाचित्र नासाला पाठवावे. त्यावरून वैज्ञानिकांना मंगळ ग्रहाचा अभ्यास करता यावा, हा त्यांचा उद्देश होता. मायक्रॉब्स नावाच्या सुक्ष्म जीव घटकांना पोषक वातावरण मंगळावर आहे की नाही याचा शोध घेण्यासाठीच क्युरीऑसिटी रोव्हर विशिष्ट पद्धतीने निर्माण करण्यात आला होता. यामध्ये तयार करण्यात आलेल्या ऑनबोर्ड लॅबमध्ये मंगळावर सापडलेल्या काही ठस्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.

Leave a Comment