बीएमडब्ल्यूचा माफीनामा


कारमध्ये इंजिन लागण्याच्या घटनांबाबत जगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूने माफी मागितली असून बीएमडब्ल्यूच्या दक्षिण कोरिया युनिटने या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगत याप्रकरणी खेद व्यक्त केला आहे.

कारमधील एग्जॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन (ईजीआर) कूलरमध्ये गळती होत असल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. गाडी दीर्घकाळासाठी सुसाट चालवल्यानंतर इंजिनला आग लागायची. कंपनीने इंजिनमध्ये आग लागल्याच्या घटनांमुळे हजारो गाड्या परत मागवल्या होत्या. या घटनांची चौकशी वाहतूक मंत्रालयाकडून सुरू असून त्यांना आम्ही सहकार्य करत असल्याचे कंपनीच्या कोरिया युनीटचे चेअरमन किम ह्यो-जून यांनी सांगितले. किम ह्यो-जून यांनी यावेळी बोलताना ग्राहकांना झालेल्या त्रासाबाबत खेद व्यक्त केला.

बीएमडब्ल्यू गाड्यांना आग लागण्याच्या २७ घटना जानेवारी ते जुलैदरम्यान समोर आल्या होत्या. कंपनीने त्यानंतर हजारो गाड्या परत मागवल्या होत्या. बीएमडब्ल्यूने यापूर्वीही आग लागण्याच्या घटनांमुळे गाड्या परत मागवल्या होत्या. याशिवाय काही तांत्रिक कारणांमुळे इंग्लंडमधून जवळपास सव्वा तीन लाख गाड्या परत मागवल्या होत्या.

Leave a Comment