तणावाच्या काळात इंटरनेट सुरू, पण सोशल मिडियावर बंदी ?


नवी दिल्ली – फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप सारख्या समाज माध्यमांना तणावाच्या काळात अफवा पसरू नये म्हणून त्यावेळेपूर्ती आता आळा घालण्यात येणार असून इंटरनेट तणावाच्या काळात सुरू असेल पण समाज माध्यमांवर बंदी येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागिलता आहे.

फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम सारख्या माध्यमांना राष्ट्रीय आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीने आपातकालीन परिस्थितीत बंद ठेवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार विचार करत असून यासंदर्भात दूरसंचार विभागाने एक पत्र टेलिकॉम ऑपरेटर, भारतीय इंटरनेट सेवा प्राधिकरण, सेल्युलर ऑपरेटर्स असोशिएशन ऑफ इंडियाला पाठवले होते. यानुसार शांतता भंग होत असल्यास समाज माध्यमांना बंद ठेवले जाईल.

समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरत असल्यामुळे जमाव गटांचे हल्ले तसेच समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दंगे होण्यासारख्या घटना घडत आहेत. केंद्र सरकारने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. आयटी अॅक्ट ६९ ए नुसार केंद्र सरकारला समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याचे अधिकार आहेत.