या बॉलीवूड सेलिब्रिटीजमध्ये आहे छत्तीसचा आकडा


‘फ्रेन्डशिप डे’ नुकताच पार पडला असून लहानांपासून ते वयस्क मंडळींपर्यंत सर्वांनी आपापल्या मित्रमंडळींना भरपूर शुभेच्छा दिल्या. काहींनी एकत्र भेटून हा दिवस साजरा केला, तर इतरांनी फोनवरून मेसेज पाठवून, किंवा सोशल मिडीयाच्या माध्यामातून आपल्या दोस्त मंडळींच्या सोबत छायाचित्रे शेअर करून हा दिवस यादगार बनविला. फ्रेन्डशिप डे साजरा करण्यात बॉलीवूडचे कलाकार ही मागे नव्हते. त्यांनी ही या दिवसाच्या निमित्ताने आपल्या मित्र-मैत्रिणींच्या सोबतची छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत. बॉलीवूडमधील काही कलाकार असे आहेत, ज्यांची आपल्या सहकलाकारांशी असलेली मैत्री वर्षानुवर्षे टिकून आहे, तर काही कलाकार असे ही आहेत, ज्यांचा काही कलाकारांशी छत्तीसचा आकडा आहे.
कंगना रानौत आणि दीपिका पदुकोन यांची एकमेकींशी मैत्री नसली, तरी यांच्यामध्ये शत्रुत्व खचितच नव्हते. पण कंगनाच्या सुपरहिट ‘क्वीन’ चित्रपटाने मिळविलेल्या भरघोस यशानिमित्त दिल्या गेलेल्या मेजवानीसाठी दीपिकाने हजेरी लावली नाही, किंवा तिने कंगनाचे अभिनंदनही केले नाही. तिथपासून सगळा मामला बिघडला. तेव्हापासून कंगनाने दीपिकाबद्दल काही चांगले बोलणे अजिबात बंद केले. त्यानंतर दीपिकाचा सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘पिकू’चे यश सेलिब्रेट करण्यासाठी दिल्या गेलेल्या मेजवानीमध्ये कंगना गेली नाही. तेव्हापासून सुरु झालेला हा अबोला आजही दोघी अभिनेत्रींच्या मध्ये कायम आहे.

एके काळी बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या मैत्रीचा आदर्श सर्वांच्यापुढे सतत असे, पण १९७० च्या दशकानंतर या दोघांच्या मैत्रीला जणू कोणाची दृष्टच लागली. या दोघा दिग्गज कलाकारांनी ‘शान’, ‘काला पत्थर’, ‘दोस्ताना’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण अमिताभ शत्रुघ्न सिन्हा यांच्यापेक्षा उंच असल्याने त्यांचा ‘स्क्रीन प्रेझेन्स’ जास्त प्रभावी वाटत असे. या कारणावरून दोघांचे बिनसले, ते आजतागायत हे संबंध सुधारले नाहीत.

दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांची दुष्मनी तर जगजाहीर आहे. दीपिका आणि रणबीरचे प्रेमप्रकरण सुरु असताना, एकी कडे रणबीरने कतरिनाशी संधान जुळविले. त्यांनतर दीपिका-रणबीर संबंध संपले, आणि रणबीर कतरिनाचे प्रेम प्रकरण सुरु झाले. रणबीर आणि कतरिनाचे संबंधही फार काळ टिकले नाही आणि काही काळानंतर दोघे वेगळे झाले. पण दीपिका आणि कतरिनाचे संबंध बिघडले, ते मात्र कायमचेच. शाहरुख खान आणि अजय देवगण यांचे संबंध बिघडले ‘करण अर्जुन’ या चित्रपटाच्या वेळेपासून. खरे तर या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि अजय देवगण या जोडीला निवडले गेले होते. पण अजयला शाहरुख करणार असलेली भूमिका करायची होती. ही भूमिका त्याला न मिळाल्यामुळे त्याने चित्रपट सोडला आणि तेव्हापासून शाहरुख खान आणि अजय देवगणमध्ये वितुष्ट आले, ते कायमचेच.