कुलेश्वर महादेव मंदिर, सीतेने वाळूच्या शिवलिंगाची केली होती पूजा


छत्तिसगढ मध्ये रामाने वनवासातील काही काळ वास्तव्य केले होते याचे अनेक पुरावे आजही मिळतात. येथील राजिम येथे असलेले कुलेश्वर महादेव मंदिर हे महानदी, पेरी आणि सोंढूर या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असून येथे वनवास काळात राहत असताना सीतामाईने वाळूचे शिवलिंग स्थापून त्याची पूजा केली होती असे सांगितले जाते. चारी बाजूनी नदीच्या पाण्याने वेढलेल्या या जागी साधारण १२०० वर्षापूर्वी म्हणजे ८ व्या शतकात शिवमंदिर बांधले गेले. असेही सांगतात या मंदिरात गुप्त भुयार असून ते नदी काठावर असलेल्या लोमस ऋषींच्या आश्रमापर्यंत जाते. श्रावणात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते.

पावसाळ्यात नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते आणि हे मंदिर चारी बाजूनी पाण्याने वेढले जाते. तेव्हा नावातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर स्थापत्याचा सुंदर नमुना आहे. वर्षानुवर्षे पुराच्या पाण्याने वेधले जात असूनही या मंदिराचा पाया एकदम भक्कम स्थितीत आहे. नदीकाठी राजीवलोचन मंदिर असून तेथेच जवळ मामा मंदिर आहे.

कुलेश्वर मंदिराला भाचा मंदिर तर नदीकाठच्या मंदिराला मामा मंदिर म्हणले जाते त्यामागची कथा अशी सांगतात कि, जेव्हा कुलेश्वर मंदिर नदीच्या पुरात बुडू लागायचे तेव्हा या मंदिरातून मामा वाचवा असा आवाज यायचा आणि नदीच्या पुराचे पाणी या मामा मंदिरातील शिवलिंगाला पुराच्या पाण्याचा स्पर्श झाला कि पूर ओसरू लागायचा. त्यामुळे आजही येथे नावेतून जात असताना मामा भाच्याला एकत्र जाऊ दिले जात नाही. श्रावणात येथे १० दिवसांची यात्रा भरते. कुलेश्वर मंदिराचे बांधकाम त्याकाळी २ किमी परिसरात नदीतील खडक शोधून त्यावर केले गेले आहे.

Leave a Comment