भारतातील सर्वात पहिला 'बेबी स्पा' हैदराबादमध्ये सुरु - Majha Paper

भारतातील सर्वात पहिला ‘बेबी स्पा’ हैदराबादमध्ये सुरु


आजकाल सर्वच ठिकाणी स्पाची सुविधा आता सहज उपलब्ध होऊ लागली आहे. या मध्ये निरनिराळ्या ब्युटी ट्रीटमेंटस् पासून ते स्टीम बाथ, सौना, मसाज, अरोमाथेरपी या आणि अश्या अनेक सुविधा उपलब्ध असतात. पण बहुतेक सर्वच स्पा मध्ये पुरविल्या जाणाऱ्या सुविधा या तरुण मंडळी आणि अर्थातच प्रौढ व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन पुरविण्यात येतात. त्यामुळे अगदी लहान बच्चेकंपनी मात्र या आरामदायी सुविधांपासून दूरच राहते. पण आता या बच्चेकंपनीला देखील स्पाचा आनंद घेता येणार आहे. भारतातील सर्वात पहिला बेबी स्पा हैदराबाद शहरामध्ये सुरु झाला आहे.

हा स्पा खास तान्ह्या मुलांकरिता असून यामध्ये केवळ नऊ महिन्यांपर्यंत वय असलेल्या तान्ह्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. याहून जास्त वय असलेल्या मुलांना येथे प्रवेश नाही. स्पा ट्रीटमेंट शारीरिक आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली गेली आहे. त्यामुळे लहान मुलांना आराम मिळावा अश्या दृष्टीने हा स्पा तयार करण्यात आला आहे. इतक्या लहान मुलांची तब्येत आणि त्वचा अतिशय नाजूक असल्याने या स्पा मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वच सोयी हे बाब लक्षात घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच या स्पा मध्ये लहान मुलांची काळजी घेण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलेला स्टाफ उपस्थित असणार आहे. इतक्या लहान वयाच्या मुलांना हाताळणे हे काम अतिशय अवघड असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारे येथील स्टाफ प्रशिक्षित असणार आहे. इतक्या लहान वयाच्या मुलांसाठी स्पाची संकल्पना भारतामध्ये नवीन असून, ही कल्पना कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच सांगू शकेल.

Leave a Comment