सरोवरात वसलेले गेनवी बनलेय पर्यटकांचे आकर्षण


पश्चिम आफ्रिकेच्या बेनीन येथिल नोकोऊ या मोठ्या सरोवरात वसलेले गेनवी हे गाव आता पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. विशेष म्हणजे गुलाम बनण्यापासून बचाव व्हावा म्हणून हे गाव सरोवरात वसविले गेले होते. या गावची लोकसंख्या २० हजार आहे आणि नोकोऊ या सरोवरात या गावाने आपला पसारा मांडला आहे. या गावातील अनेक घरे सरोवराच्या मधोमध आहेत. सरोवरात असलेले आफ्रिकेतील हे सर्वात मोठे गाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार १६ व्या १७ व्या शतकात फोन या समुदायाचे लोक या ठिकाणचे मूळ रहिवासी फिनुरा यांना गुलाम बनविण्यासाठी येत असत. मात्र त्यावेळच्या धार्मिक रितीप्रमाणे ते पाण्यात जात नसत. त्यामुळे या फिनुरा समाजाच्या लोकांनी त्याची घरे सरोवरात बांधली. आता या ठिकाणी घरे, दुकाने, चर्च, मशिदी, हॉटेल, पोस्ट, बँक्स सर्व पाण्यात असून जमिनीवर असलेली एकमेव इमारत म्हणजे शाळा आहे. हि शाळाही लोकांनी कडेची माती सरोवरात टाकून कृत्रिम जमीन तयार करून बांधली आहे.

येथील सर्व वस्ती लाकडी खांबांवर बांधलेल्या इमारती, घरातून आहे. येथे तरंगता बाजारही भरतो. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे. या गावाला आफ्रिकेचे व्हेनिस असेही म्हटले जाते. युनेस्कोने या गावाला १९९६ मध्ये जगातील वारसा यादीत समाविष्ट केले आहे. येथे ३ हजार इमारती आहेत.

Leave a Comment