जेट एअरवेज कंपनीचे ‘दिवाळखोर लँडिंग’; आर्थिक परिस्थिती चिंताजनक


नवी दिल्लीः जेट एअरवेज या देशी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीला ‘इमर्जन्सी लँडिंग’ करावे लागण्याची शक्यता असून कंपनीची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे आणि कंपनीने खर्चामध्ये लक्षणीय कपात न केल्यास आगामी ६० दिवसांत त्यांच्या तिजोरीत खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावरही आता गदा आल्याने कंपनीत अस्थिरता, अस्वस्थता पसरली आहे.

कंपनी व्यवस्थापनाने दोन महिन्यांनंतर कंपनी चालवणे शक्य नसल्याचे आम्हाला सांगितले असून काही ठोस पावले खर्चाला कात्री लावण्यासाठी उचलली जातीलच, पण ते वेतन कपातीची घोषणा करून मोकळे झाले आहेत. ही परिस्थिती आता काही काल-परवा उद्भवलेली नक्कीच नाही. पण, कंपनीने आत्तापर्यंत आम्हाला याबाबत जराही कल्पना दिली नसल्यामुळे व्यवस्थापनावरील कर्मचाऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला असल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Leave a Comment