
पुणे – आपल्या कुटुंबियांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करून ख्यातनाम उद्योगपती संजय किर्लोस्कर यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे संजय हे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून आपल्या भावांनी संपत्तीच्या वाटपासंदर्भात झालेल्या कराराचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवत ७५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा त्यांनी ठोकला आहे.
संजय किर्लोस्करांची भावांविरोधात ७५० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा
कौटुंबिक कराराची आपले भाऊ अतुल व राहूल तसेच लांबच्या नात्यातील भाऊ विक्रम व दिवंगत गौतम कुलकर्णी यांचे कुटुंबिय यांनी पायमल्ली केल्याचा आरोप संजय यांनी पुणे सिव्हिल कोर्टात केला आहे. यासंदर्भातील वृत्त पुणे मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या करारामध्ये कुणी कुठला व्यवसाय करायचा याची निश्चिती करण्यात आली होती, पण हा करार आपल्या भावांनी न पाळल्याने व त्यांना मज्जाव असलेला व्यवसाय त्यांनी केल्यामुळे आपल्याला ७५० कोटी रुपयांचा फटका बसल्याचे संजय किर्लोस्कर यांचे म्हणणे आहे.
