भारताचे ‘छायाचित्रकार राजपुत्र’ (‘फोटोग्राफी प्रिन्स’) सवाई राम सिंह


जयपूर हे राजे सवाई रामसिंह दुसरे, अतिशय प्रगत विचारांचे समजले जात असत. त्यांना फोटोग्राफी मध्ये अतिशय रुची होती, आणि त्याबद्दल त्यांना अफाट ज्ञानही होते. ते उत्तम छायाचित्रकार होते. म्हणूनच त्यांना भारताचे ‘फोटोग्राफी प्रिन्स’ असेही म्हटले जाते. राजे सवाई रामसिंह हे त्यांच्या रयतेला प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जाणारे, आधुनिक विचारसरणीचे राज्यकर्ते होते. १८३५ सालापासून ते १८८० सालापर्यंत सवाई रामसिंह जयपूरचे राजे होते.

एक कुशल राजनेता आणि कलेचे जाणकार असलेल्या महाराज सवाई रामसिंह यांना फोटोग्राफीचा छंद होता. किंबहुना छायाचित्रीकरणामध्ये त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. जयपूर, आग्रा, बनारस आणि कोलकाता येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांची सुंदर छायाचित्रे सवाई राम सिंह महाराजांनी टिपली आहेत. पण निसर्गदृश्यांची छायाचित्रे टिपण्यापेक्षा व्यक्तींची छायाचित्रे टिपण्यामध्ये त्यांना अधिक रुची होती.

सवाई रामसिंह महाराजांनी टिपलेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांच्या संग्रहामध्ये अनेक राजा-महाराजांच्या आणि शाही परिवारातील सदस्यांच्या छायाचित्रांच्या समावेश आहे. तसेच अनेक फकीर, राजवाड्यामध्ये निमंत्रित पाहुणे, राजवाड्यातील जनानखान्यातील महिला यांचीही अनेक सुंदर छायाचित्रे रामसिंह महाराजांनी टिपून ठेवली आहेत. महाराजांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या द्वारे तत्कालीन संस्कृती, परंपरा आणि वेशभूषेचे उत्तम दर्शन घडते. उत्तम छायाचित्रे खेचण्याच्या या कौशल्यामुळे ‘छायाचित्रकार राजे’ असा लौकिक महाराज सवाई रामसिंह यांनी संपादन केला होता.

Leave a Comment