पत्नीच्या एका इच्छेखातर त्याने २३ वर्षांत जमीनीखाली बनवला अख्खा महाल


येरेवन – अर्मेनियातील अरिंज गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीला बेसमेंट बनवण्याची विनंती केली आणि तिच्या पतीने जमीनीखाली अख्खा महालच बनवला. बटाटे ठेवण्यासाठी जमीनीखाली एक तळघर हवे अशी इच्छा तोस्या हिने व्यक्त केली होती. या तळघरावर पती लेवोन यांनी २३ वर्षे मेहनत घेतली. तसेच एक अख्खा भुयारी महाल तयार केला. लेवोन यांचे २००८ मध्ये निधन झाले. परंतु, हा भुयारी महाल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. देश-परदेशातून येणारे पर्यटक या महालाला भेट देतात.

मध्ययुगीन इमारतीचा लुक जमीनीखाली बनवलेल्या महालास देण्यात आला आहे. गुहा आणि कालवे सुद्धा महालात आहेत. दारांना गोल आकार देण्यात आला आहे. भिंतींवर मोठ-मोठ्या कलाकृती दिसून येतात. तोस्या स्वतः येथे येणाऱ्या पर्यटकांना या महालाची सफर करून देतात आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. यामध्ये ७ खोल्या आहेत. संपूर्ण महाल प्रेमाचे प्रतिक असल्याचे त्या म्हणतात.

तोस्या सांगतात, लेवोन यांनी १९८५ मध्ये खोदकाम सुरू केले तेव्हापासून ते थांबलेच नाहीत. अनेकवेळा मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम होते. घराच्या बांधकामाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. भुयारी बांधकाम करण्यासाठी ते रोज १८ तास काम करायचे. कामाच्या वेळीच काही वेळ डुलकी सुद्धा घ्यायचे आणि पुन्हा काम सुरू करायचे. त्यांना ठाम विश्वास होता की हे काम करताना त्यांना ईश्वर मदत करत आहे. २० वर्षे काम करून लेवोन यांनी जमीनीखाली ३००० चौरस फुट खोदकाम केले होते. लेवोनची मुलगी अरक्स्या यांनी सांगितले, खोदकामाचे आवाज लहानपणी मला ऐकायला येत होते. सुरुवातीला जमीन खोदणे त्यांना खूप कठिण गेले. कारण, जमीनीखाली बेसॉल्टचे खडे होते.

मातीने भरलेल्या ट्रकांवरून लेवोन यांच्या मेहनीताचा अंदाज येईल. त्यांनी खोदलेल्या जमीनीतून तब्बल ६०० ट्रक भरून माती काढण्यात आली. या महालाची एक भिंत २००८ मध्ये कोसळली. याच दरम्यान वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने लेवोन यांचा मृत्यू झाला. तोस्याने आपल्या पतीच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी या महालाला एक म्युझिअम बनवले आहे.

Leave a Comment