या ठिकाणी सर्वप्रथम सुरु झाली शिवलिंगाची पूजा


उत्तराखंड हि देवभूमी म्हणून ओळखली जाते. हिमालयाच्या कुशीत असलेल्या या राज्यात महादेवाची अनेक मंदिरे आहेत आणि श्रावण महिन्यात या सर्व ठिकाणी भाविकांची गर्दी लोटते. अलमोडा जवळ असेलेले जागेश्वर धाम हे ठिकाण अध्यात्माचे प्रमुख केंद्र असून शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा या ठिकाणी सर्वप्रथम सुरु झाली असे मानले जाते. या ठिकाणाचे वर्णन पुराणात आहे.

असे मानले जाते कि या ठिकाणी सप्तऋषींनी तपस्या केली होती. येथे बाल शिव आणि तरुण शिव स्वरूपातही महादेवाची पूजा होते. आदि शंकराचार्यांनी या जागी भ्रमण केले होते आणि येथील मंदिराला मान्यता मिळवून दिली असे सांगतात. देवदार वृक्षांच्या दाट जंगलात असलेली हि मंदिरे वास्तुकलेचा सुंदर नमुना आहेत. येथे लहानमोठी १२४ मंदिरे असून त्यांचे बांधकाम लाकूड अथवा सिमेंटमध्ये नाही तर मोठमोठ्या शिलाखंडात केले गेले आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या जुन्या मार्गावर हा मंदिर समूह आहे.


यामध्ये केंदारनाथ शैलीतील मंदिरे असून मुख्य मंदिर सर्वात मोठे आहे. त्याला महामृत्युंजय शिवमंदिर म्हटले जाते. येथेच महामृत्युंजय जपाचा उगम झाला असेही सांगितले जाते. मंदिराच्या आवारात शेकडो शिलालेख आहेत त्यातील काही ब्राह्मी तर काही संस्कृत भाषेत आहेत. या मंदिर समूहात भैरव, पार्वती, दुर्गा, हनुमान, केदारनाथ यांचीही मंदिरे असून हा सर्व समूह पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. मंदिरांचे बांधकाम कत्युरी, उत्तर कत्युरी आणि चंद्र काळात केले गेले आहे. हे ठिकाण शिवाची तपोभूमी म्हणूनही ओळखले जाते. दरवषी येथे श्रावणात मोठी जत्रा भरते.

Leave a Comment