केट मिडल्टनचे पालक कोट्यवधींचे मालक, सफल व्यावसायिकही


केट मिडल्टनने जेव्हा ब्रिटीश शाही घराण्याचा राजपुत्र, प्रिन्स विलियमशी लग्न केले, तेव्हाच ती विलीयमच्या आणि पर्यायाने काही अंशी राजघराण्याच्या संपत्तीची देखील मालकीण बनली. पण भरपूर संपत्ती आणि उंची राहणीमान केटच्या आयुष्याचा भाग असून, विवाहापूर्वीही तिच्या चांगल्याच परिचयाचे आणि सवयीचे होते. केटचे माता-पिता कॅरोल आणि मायकल याची गणना इंग्लंड मधील प्रतिष्ठित आणि धनिक व्यावसायिकांमध्ये केली जाते. केटच्या पालकांचा ‘पार्टी पीसेस’ नामक पार्टीज साठी लागणाऱ्या सर्व वस्तू पुरविण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय चांगलाच तेजीत असून, आजवर त्यांनी या व्यवसायाद्वारे सुमारे ७० मिलियन पाउंडस् किंमतीची मालमत्ता जोडली आहे.

‘हॅलो मॅगझिन’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कॅरोल आणि मायकल यांची प्रथम भेट, ते दोघे ब्रिटीश एअरवेज मध्ये नोकरीला असताना झाली. १९८० साली हे दोघे, डॉर्नी, बकिंगहमशायर येथील सेंट जेम्स चर्चमध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर ब्रिटीश एअरवेज मधील निकारी सोडून देऊन, त्या दोघांनी लहान मुलांच्या पार्टीज साठी आवश्यक ते सामान पुरविण्याचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायाला त्यांनी ‘पार्टी पीसेस’ असे नाव दिले. आता हा व्यवसाय चांगलाच फळाला आला असून, त्याची आजच्या काळातील उलाढाल चाळीस मिलियन पाउंड्स पेक्षाही अधिक आहे.

जेव्हा मिडल्टन दाम्पत्याची अपत्ये लहान होती, तेव्हा ते वेर्नम डीन येथील एका प्रशस्त घरामध्ये राहत असत. त्या घराची किंमत ५४०,००० डॉलर्स इतकी होती. त्यानंतर २००२ साली मिडल्टन दांपत्याने लंडमधील प्रतिष्ठित चेल्सी भागामध्ये एक फ्लॅट खरेदी केला. याच घराची किंमत २०११ साली १.६ मिलियन डॉलर्स इतकी होती. शिवाय हे घर घेण्यासाठी मिडल्टन दाम्पत्याने कोणतही कर्ज घेतले नव्हते. २००५ साली मिडल्टन दाम्पत्याने बकलबेरी, बर्कशायर येथेही घरे आणि अनेक कमर्शियल प्रोपर्टीज खरेदी केल्या. सध्या मायकल अन कॅरोल राहत असलेले त्यांचे बर्कशायर येहील घरही आठ मिलियन डॉलर्स इतक्या किंमतीचे आहे.