उड्डाण रद्द करण्यात इंडिगो सर्वात पुढे, एअर इंडिया दुसऱ्या स्थानी


विमान कंपन्यांकडून प्रवाशांचे उड्डाण रद्द करण्यात इंडिगो एअरलाईन्स सर्वात पुढे असून सरकारी मालकीची एअर इंडिया दुसऱ्या स्थानी असल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीतून पुढे आले आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2017 मध्ये इंडिगोने 1934 उड्डाणे रद्द केली, यात 52, 489 प्रवाशांना त्रास झाला. या वर्षी भरपाई म्हणून प्रवाशांना केवळ 5 लाख रुपये देण्यात आले.

लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल नागरी हवाई वाहतूक उड्ड्यन मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत म्हणजे मे महिन्यापर्यंत इंडिगोने 1824 उड्डाण रद्द केले आहेत. कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द केल्यामुळे 1.08 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रभावित झाले आहेत.

दरम्यान, निओ विमान सेवेत नसणे, पुरवठा उशिरा होणे आणि देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या वेळेस वातावरण बिघडणे यांमुळे जानेवारी ते मे महिन्या दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द झाल्याचे कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

विमान कंपन्यांच्या उड्डाणातील विलंब, रद्द करणे किंवा बोर्डिंगला मनाई करणे यामुळे प्रवाशांना भरपाई देणे आवश्यक आहे, असे नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी यावेळी सांगितले. तसेच निर्धारित वेळेपेक्षा 6 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास कंपन्यांना संपूर्ण भाडे परत करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment