फेसबुकच्या फुकट्या कर्मचाऱ्यांचे खाणे होणार बंद


बहुतेक आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खाण्यापिण्याच्या सोयी मोफत देतात. त्याचप्रमाणे अमेरिकेतील फेसबुकदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना खाण्यापिण्याच्या मोफत सुविधा देत होते. पण आता यात बदल होणार आहे. लवकरच सिलिकॉन व्हॅलीतील माउंटन व्ह्यू या नवीन कार्यालयात फेसबुकचे दोन हजार कर्मचारी स्थलांतर करणार असून तिथे त्यांना अनेक सोयीसुविधा मिळतील पण या शहरातील कायद्यामुळे त्यांना मोफत खाणे पिणे मिळणार नाही.

सगळ्या कॉर्पोरेट प्रकल्पांवर २०१४ पासून फेसबुकचे नवे कार्यालय असलेल्या माउंटन व्ह्यूने बंधन घातलेले आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना या शहरात असलेल्या कंपन्यांना संपूर्णपणे मोफत अनुदानित खाद्यपदार्थ देता येणार नाहीत. सॅनफ्रान्सिस्कोसारख्या अन्य शहरांतही या शहरामधील नियमांची लाट पसरेल अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. येथील नियमांप्रमाणे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या खाण्या पिण्यासाठी ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुदान देऊ शकत नसल्यामुळे अत्यंत महागडी कॉफी असो, पिझ्झा बर्गर असो व अन्य पदार्थ असोत, किमान ५० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना आपल्या खिशातून भरावी लागणार आहे.

सॅनफ्रानिसस्कोमधील दोन लोकप्रतिनिधी कंपन्यांमध्ये कॅफेटेरिया असण्यावरच बंदी घालावी अशा विधेयकाची मागणी माउंटन व्ह्यूच्या उदाहरणावरून बोध घेत करणार आहेत. रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन अशा विधेयकाला स्वाभिवकच पाठिंबा देत आहे. स्थानिकांच्या उद्योगांवर कंपन्यांच्या इन-हाऊस कॅफेटेरियामुळे अन मोफत खाण्यामुळे गदा येते असा मूळ युक्तिवाद आहे. ऑफिसमध्येच जर मोफत खाणे मिळाले तर बाहेर कोण जाईल, त्यामुळे ते बंद व्हावे अशी ही मागणी आहे.

Leave a Comment