इम्रान खान प्रमाणेच हे ही क्रिकेटपटू बनले नामवंत राजनेते


एके काळी प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असलेले इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान होणार हे जवळ जवळ निश्चितच झाले आहे. आपल्या क्रिकेटसंघाला जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या या कर्णधाराने राजनीतीच्या क्षेत्रातही बाजी मारली आहे. मात्र क्रिकेटपटू म्हणून नाव कमविल्यानंतर राजनीतीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणारा इम्रान हा एकमेव क्रिकेटपटू नाही.

पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांनी देशाचे सर्वोच्च पद मिळवून अनेक वर्षे राज्यकारभार चालविला हे आपल्याला ठाऊकच आहे. पण नवाझ शरीफ एक उत्तम क्रिकेटपटूही होते, ही माहिती लोकांच्या फारशा परिचयाची नाही. पाकिस्तानातील एका नामवंत क्लब कडून शरीफ क्रिकेट खेळत असत. पण प्रथम दर्जाच्या क्रीकेट सामन्यामध्ये मात्र शरीफ आपले कौशल्य जगाला दाखवून देऊ शकले नाहीत. या सामन्यामध्ये शरीफ धावा न करताच पॅव्हिलीयनमध्ये परतले. अश्या रीतीने क्रिकेटपेटू म्हणून त्यांची कारकीर्द संपुष्टात आली.

सर अॅलेक डग्लस होम हे ब्रिटनचे प्रधानमंत्री होते, त्याचप्रमाणे प्रथम श्रेणीचे क्रीकेटपटूही होते. ते मिडलसेक्स संघाकडून खेळत असून, ऑक्सफर्ड विद्यापीठाकडूनही ते क्रिकेट खेळत असत. दहा प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये त्यांनी आपले कौशल्य प्रदर्शित केले होते. १९६३ सालापासून ते १९६४ सालापर्यंत ते ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. तसेच मिडलसेक्स क्रिकेट बोर्डाचेही ते अध्यक्ष होते.

सर फ्रान्सिस बेल हे औपचारिक रीत्या केवळ वीसच दिवस न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. तत्कालीन पंतप्रधान विलियम मेसी यांच्या आकस्मिक निधनामुळे सर बेल यांना पंतप्रधानपद काही काळ सांभाळावे लागले होते. बेल हे ही उत्तम क्रिकेटपेटू असून, त्यांनी ही अनेक प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता. तसेच फिजी देशाचे सर्वेसर्वा समजले जाणारे कामिसे मारा यांनी एकवीस वर्षे फिजीचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर ते सात वर्षे फिजीचे राष्ट्राध्यक्षही होते. मारा हे फिजीच्या क्रिकेट संघाचे उपकर्णधार असून, त्यांनी ही अनेक प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये हिस्सा घेतला होता.

Leave a Comment