जगातील सर्वात श्रीमंत पाच अब्जाधीश


उत्तुंग यशाची आणखी एक पायरी चढत, रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे नाव जगातील वीस सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स ने प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये मुकेश अंबानी यांना चौदावे स्थान मिळाले आहे. अंबानींची एकूण मालमत्ता २१ जुलै २०८१ या दिवशीपर्यंत ४५.१ बिलियन डॉलर्स इतक्या किंमतीची असून या वर्षामध्ये आतापर्यंत अंबानी यांनी ४.७९ बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. मुकेश अंबानी यांनी कमाईच्या बाबतीत चीनच्या सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीचे मालक असलेल्या जॅक मा यांना मागे टाकले आहे. अंबानी, या यादीमध्ये समाविष्ट असणारे एकमेव भारतीय आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अॅमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्याचे घोषित करण्यात आले आहे. बेझोस यांची एकूण मालमत्ता १५० बिलियन डॉलर्सपेक्षा ही अधिक असल्याचे समजते.

या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी. बिल गेट्स यांच्या मालकीची असलेली एकूण मालमत्ता ९५.५ बिलियन डॉलर्सची आहे. ही किंमत अॅमेझॉनच्या बेझोस यांच्या एकूण संपत्तीपेक्षा ५५ बिलियन डॉलर्सने कमी आहे.

या यादीमध्ये तिसरा क्रमांक आहे फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांचा. चौतीस वर्षीय मार्क यांच्या मालकीच्या संपत्तीची एकूण किंमत ८१.६ बिलियन डॉलर्स असून, बर्कशायर हॅथवे कंपनीचे सीइओ बफेट यांच्या मालकीच्या संपत्तीपेक्षा झुकरबर्ग यांची संपत्ती ३७३ मिलियन डॉलर्सने जास्त आहे. वॉरन बफेट यांचे नाव या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

एके काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणऱ्या बफेट यांचे नाव, पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरले आहे. याचे कारण, बफेट यांनी धर्मादाय संस्था सुरु केली असून, त्याद्वारे पुष्कळ गरजूंना आर्थिक मदत केली आहे. ही संस्था बफेट यांनी २००६ साली सुरु केली आहे.

फ्रेंच नागरिक असलेले बर्नार्ड आर्नोल्ट यांचे नाव या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. बर्नार्ड आर्थिक निवेशक असून, ‘लक्झरी गुड्स’ पुरविणारी जगातील सर्वात नामांकित कंपनी ‘एलव्हीएमएच’चे ते अध्यक्ष आणि सीइओ आहेत. फ्रान्समध्ये सर्वात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींमधील एक म्हणून बर्नार्ड यांची गणना होते. बर्नार्ड यांच्या मालकीच्या संपत्तीची एकूण किंमत ६४ बिलियन डॉलर्स आहे.

Leave a Comment