कशी ओळखाल नकली गॅजेट्स ?


आजकाल आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करीत असतो, यामध्ये प्रामुख्याने मोबाईल फोन्स, टॅब्लेट, इत्यादींचा समावेश असतो. अनेकदा आपण या वस्तू ऑनलाईन मागवत असतो, किंवा एखाद्या ठिकाणी बाजारभावाच्या मानाने ती वस्तू कमी किंमतीला मिळत असते, म्हणून आपण ती तिथून खरेदी करून आणतो. पण अश्या वेळी आपण देत असलेल्या किंमतीच्या बदल्यात आपल्या हातामध्ये ‘ओरिजिनल’ वस्तू मिळते आहे, की ‘डुप्लिकेट’ हा आपल्याला ओळखता न आल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यताही असते. त्यामुळे आपण विकत घेत असलेले गॅजेट हे संपूर्णतया ‘जेन्युईन’ असल्याची खात्री पटल्यानंतर मगच ती वस्तू करणे अगत्याचे ठरते. गॅजेट खरेदी करीत असताना काही वस्तू विशेष लक्षामध्ये घेणे आवश्यक असते.

कोणतेही गॅजेट खरेदी करताना त्याचे पॅकेजिंग काळजीपूर्वक पाहावे. ‘ओरिजिनल’ गॅजेटच्या पॅकेजिंग वरील नावाचे आणि इतर माहितीचे प्रिंट अतिशय सुस्पष्ट अक्षरांमध्ये असते. तसेच ही माहिती छापण्याकरिता वापरला जाणारा फॉन्ट सगळीकडे एकसारखा असतो. पॅकेजिंग अलगद हलविले असता, त्याच्या आतील एकही वस्तू सुटी असलेली जाणविली, तर ते गॅजेट डुप्लिकेट असण्याची शक्यता असते. ओरिजिनल गॅजेटचे पॅकेजिंग, उत्पादकांकडून अतिशय व्यवस्थित केले जाते, जेणेकरून आतील कोणतीही वस्तू, ट्रान्सपोर्टच्या दरम्यान, किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत सुटी होणार नाही.

आपण खरेदी केलेल्या गॅजेट बद्दलची सर्व माहिती त्याच्या सोबत असलेल्या युजर मॅन्युअल मध्ये उपलब्ध असते. या मॅन्युअल मध्ये गॅजेटबद्दलची सर्व तांत्रिक माहिती, इंग्रजी बरोबरच, ज्या देशामध्ये ते गॅजेट बनविले गेले, त्या देशाच्या स्थानिक भाषेमध्येही उपलब्ध असते. ही माहिती वाचण्याचा प्रयत्न करीत असता जर भलत्याच भाषेमध्ये दिलेली असल्याचे आढळले, किंवा इंग्रजीमधील माहितीमध्येही व्याकरणाच्या चुका आढळल्या, तर तुम्ही खरेदी केलेले गॅजेट ओरिजिनल नसण्याची शक्यता जास्त असते.

आपल्या गॅजेट सोबत आलेल्या इतर वस्तू काळजीपूर्वक पाहाव्या. कॉर्ड, चार्जर, हेडफोन्स आणि तत्सम इतर वस्तू बनविण्यासाठी ओरिजिनल गॅजेटचे उत्पादक अतिशय उत्तम प्रतीच्या मटेरियलचा वापर करीत असतात. हेच गॅजेट जर डुप्लिकेट असेल, तर त्यासोबत असलेल्या इतर वस्तू दुय्यम दर्जाचे मटेरियल वापरून बनविले गेल्याचे पाहायला मिळते. अनेकदा या डुप्लिकेट वस्तूंचे आकार एकसमान दिसत नाहीत व या वस्तू हाताला खरखरीत, ओबड-धोबड जाणवितात. त्याचप्रमाणे आपण खरेदी केलेल्या गॅजेटच्या उत्पादकाचे नाव असलेल्या फॉन्टकडे लक्ष देणे ही आवश्यक आहे. ओरिजिनल गॅजेट्स वरील कंपनीचा ‘लोगो’ अतिशय काळजीपूर्वक डिझाईन केलेला असतो, जेणेकरून त्याची नक्कल करणे अवघड व्हावे. हा ‘लोगो’ अतिशय सुस्पष्ट व एकसारख्या दिसणाऱ्या फॉन्ट मध्ये असतो. त्याचप्रमाणे चार्जरचे प्लग, वायर्सही दुय्यम दर्जाचे, कमी अधिक लांबी-रुंदीचे असल्यास गॅजेट नकली असण्याची शक्यता असू शकते.

Leave a Comment