मनालीजवळ वशिष्ठ गावात मुक्कामाचा आनंद नक्की लुटा


सुट्या असल्या आणि नसल्या तरी पर्यटनाचे बेत आखायला हरकत नसते. उन्हाळा, ऑक्टोबर हिट या दिवसात पर्यटनाचा आनंद लुटायला थंड हवेची ठिकाणेच हवीत. हिमाचल प्रदेशातील मनाली हे असे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मात्र यंदा मनालीला जायचा विचार करत असाल तर मुक्काम मात्र मनालीपासून केवळ ३ किमीवर असलेल्या वशिष्ट या छोट्याश्या गावात टाका. अतिशय शांत, निसर्गरम्य असे हे गाव तुमचा पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करेल यात संशय नाही.


रावी नदीच्या काठी वसलेले या चिमुकल्या गावात गरम पाण्याचे झरे आहेत आणि अनेक मंदिरे आहेत. येथील झरे औषधी गुणधर्माचे असून त्यात अंघोळ केल्यास त्वचा रोग बरे होतात असे सांगितले जाते. भगवान राम आणि ऋषी वशिष्ठ यांची मंदिरे मुख्य आहेत. खास पारंपारिक पद्धतीने बांधल्या गेलेल्या या मंदिरात लाकडावरचे अतिशय सुरेख कोरीव काम पाहायला मिळते. वशिष्ठ ऋषींची मूर्ती काळ्या दगडातील आहे. येथून जवळच राम मंदिर आहे.


या छोट्याश्या गावात चवदार अॅपल पाय, गाजर केक, विविध प्रकारचे रोल्स आणि मस्त कॉफी, शेक्स, मोमोज देणारे जर्मन रेस्टॉरंट आहेच पण जवळच असलेला जोगिणी धबधबा आणि शेजारचे जोगिणी मंदिर पाहायला विसरू नका. साहसाची आवड असलेल्यांना वॉटर रॉक क्लायबिंगची सोय आहे. तसेच येथील वर्ल्ड पीस कॅफे नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूचा मोहक निसर्ग न्याहाळताना इंटरनॅशनल खाद्यपदार्थचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच.

या गावात हॉटेल्स आहेत पण खरी मजा आहे ती आधुनिक सोयीनी युक्त असलेल्या होमस्टे मध्ये. हि मस्त घरे आपल्याला घरी राहिल्याचा आनंद देतात.

Leave a Comment