‘फ्रोझन शोल्डर’मुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करा हे उपाय


एखाद्या व्यक्तीचा खांदा अवघडल्याप्रमाणे होऊन त्यामध्ये सतत वेदना जाणवू लागली, हाताची, विशेषतः खांद्याची हालचाल करणे कठीण होऊ लागले, तर ही लक्षणे ‘फ्रोझन शोल्डर’ ची असू शकतात. फ्रोझन शोल्डर मुळे उद्भविणारी वेदना रात्रीच्या वेळामध्ये जास्त जाणविते. अनेकदा ही वेदना इतकी तीव्र असते, की त्यामुळे रात्री झोप लागणे ही कठीण होऊन बसते. खांद्यामध्ये ‘स्कार टिश्यू’ उत्पन्न होऊन, खांद्याच्या सांध्याची ‘कॅप्सूल’ कडक होऊ लागते. अश्या परिस्थितीमध्ये फ्रोझन शोल्डर उद्भवितो. खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा आल्याने खांद्यामध्ये वेदना सुरु होऊन खांद्याची हालचाल करणे कठीण होते.

ही परिस्थिती उद्भविण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे खांद्याच्या सांध्यांचा अगदी कमी वापर होणे, हे आहे. तसेच खांद्याला कधी कुठल्या प्रकारची झालेली इजा, किंवा फ्रॅक्चर, आणि मधुमेहामुळेदेखील ही व्याधी उद्भवू शकते. स्ट्रोक, हायपर किंवा हायपो थायरॉइडीझम, हृदयरोग, पार्किन्सन्स ह्यामुळेही फ्रोझन शोल्डर होऊ शकतो. जर खांद्यामध्ये वेदना सुरु होऊन सूजही येऊ लागली, तर हे बरे होण्यास काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. ह्या व्याधीसाठी औषधोपचारांच्या बरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यायामाची जोड दिल्यास फ्रोझन शोल्डर बरा होण्यास नक्कीच मदत मिळू शकते.

फ्रोझन शोल्डर ही व्याधी सर्वसाधारणपणे चाळीशीनंतर उद्भविणारी आहे. त्यातून जर व्यक्तीला मधुमेह असला, तर अश्या व्यक्तींच्या बाबतीत फ्रोझन शोल्डर ही लवकर बरी न होणारी व्याधी ठरते. जर ही वेदना जाणवू लागली, तर गरम पाण्याच्या पिशवीने, किंवा हिटिंग पॅडच्या मदतीने खांद्याला शेक घ्यावा. हा शेक सलग पंधरा मिनिटे आणि दिवसातून जमेल तितक्या वेळेला घेण्याने लाभ होईल. तसेच बर्फाने किंवा आईस पॅकने शेकल्यासही वेदना कमी होण्यास मदत होते. फ्रोझन शोल्डरसाठी काही खास व्यायामप्रकार सांगितले जातात. हे केल्याने फ्रोझन शोल्डर बरा होण्यास मदत होते.

‘टॉवेल स्ट्रेच’ या व्यायामप्रकारामध्ये तीन फुट लांबीचा टॉवेल आपल्या पाठीच्या मागे दोन्ही बाजूंनी आडवा धरावा. ज्या हातला वेदना नसेल, त्या हाताने टॉवेलचे टोक हलके ओढावे, जेणेकरून दुखणाऱ्या खांद्याला आणि हाताला स्ट्रेच मिळेल. ‘क्रॉस बॉडी रीच’ हा व्यायामप्रकार उभे राहून किंव बसूनही करता येतो. यामध्ये न दुखणाऱ्या हाताने, दुखणारा हात कोपरातून वर उचलून धरून, तो छातीवरून आडवा स्ट्रेच करावा. हा स्ट्रेच करताना खांद्यावर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. हे व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment