तामिळनाडू सरकारने फेटाळला ‘त्या’ तरुणीचा जयललितांचे अपत्य असल्याचा दावा


चेन्नई – माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर आपण जयललितांचे जैविक अपत्य असल्याचा दावा बंगळुरूमधील अमृता नामक तरूणीने मद्रास उच्च न्यायालयात केला होता. पण तमिळनाडू सरकारने अमृता हिचा दावा फेटाळून लावला असून कधीही जयललिता या गर्भवती नसल्याचे स्पष्टीकरण सरकारने न्यायालयासमोर दिले आहे.

मद्रास उच्च न्यायालयात बंगळुरू येथील अमृता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयासमोर अमृता यांनी आपली वैयक्तिक माहिती सादर केली. त्यात त्यांचा जन्म १९८० च्या दरम्यान झाल्याचे म्हटले आहे. न्यायालयासमोर तमिळनाडू सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल विजय नारायण यांनी म्हणणे मांडले. जयललिता यांची संपत्ती बळकाविण्याचा याचिकाकर्त्यांचा उद्देश असून जयललिता यांच्यासोबत याचिकाकर्त्यांचे एखादेही छायाचित्र का नाही? अशी विचारणा केली.

१९८० दरम्यानचा एक व्हिडिओ न्यायालयासमोर नारायण यांनी पुराव्यादाखल सादर केला. एका कार्यक्रमाचा हा व्हिडिओ असून अमृता यांनी दावा केल्यानुसार त्यांच्या जन्माच्या महिन्याभरापूर्वीचा आहे. जयललिता चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झाल्या असून त्यात जयललिता गर्भवती नसल्याचे स्पष्ट होते.